न्यू नागझिरा व कोका अभयारण्यात निरीक्षणात्मक अभ्यास

शिकाऱ्यांमुळे वाघांना जीव कमवावा लागतो किंवा वाघांची संख्या घटते, हे सर्वपरिचित आहेत. मात्र, झुडपांच्या काही जाती गवत नष्ट करून वाघांची संख्या घटवतात, असा एक निरीक्षणात्मक अभ्यास समोर आला आहे. अनावश्यक झुडपांच्या वाढीमुळे शहरातही अनेक समस्या निर्माण होतात. मच्छर त्यापैकीच एक मोठी समस्या, पण झुडपांमुळे अख्खी अन्नसाखळीच धोक्यात येऊन वाघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो, ही नवल करणारी बाब नुकतीच उघडकीस आली आहे.

यासंदर्भात न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका अभयारण्यात गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये या झुडपांची झपाटय़ाने वाढ झालेली असून झुडपांच्या या अतिक्रमणामुळे तेथील गवत नष्ट होऊन जैवविविधता धोक्यात आली आहे. यातील चार झुडपे देशी, तर दोन झुडपे अमेरिकेतून आलेली आहेत. येथील जनावरे कमी का होत आहेत, ही शंका त्या भागातील वनाधिकाऱ्यांना आल्याने गोंदिया वन विभागाने त्यासाठी चौघांची एक समिती स्थापन केली. त्यात न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका अभयारण्याला भेट देणाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त वनाधिकारी ए.एस. खुणे, भंडाऱ्याचे वन्यजीव रक्षक राजकमल जॉब, प्राचार्य डॉ. एस.एम. भुस्कुटे आणि गोंदियाचे वन्यजीव रक्षक सावन बाहेकर यांचा समावेश होता. चौघांच्या चमूने त्या भागाचा निरीक्षणात्मक अभ्यास करून गवतावरच नव्हे, तर त्या भागातील जैवविविधतेवर आक्रमण करून ते नष्ट करणाऱ्या वनस्पतींचे साम्राज्य शोधून काढले.

घाणेरी, महादोर, मरड शेंग किंवा अताई, रानतुळस, तरोटा आणि पिवळी काटेकोरंटी, अशी या झुडपांची नावे आहेत. यातील घाणेरी आणि रानतुळस या दोन वनस्पतींचे मूळ अमेरिकन असून ते येथील वातावरणात पुरते एकरूप झाले आहेत. घाणेरी झाडाखाली वाढून आजूबाजूचे गवत नष्ट करते, त्यामुळे तृणभक्षींना गवत मिळत नाही आणि घाणेरीला तृणभक्षी खात नाहीत, तसेच रानतुळस संपूर्ण गवताळ प्रदेशाला व्यापून टाकते. त्यास जनावरे तर खात नाहीत, पण उग्रवास भरपूर असतो. जोमाने उगवणारे हे झुडूप पाच फुटांपर्यंत वाढू शकते. पाण्यात बिया भिजल्या की, त्या चिकट होतात आणि जमिनीला चिटकून तेथेच नवीन झुडुप उगवत असल्याने वाढ जोमाने होते. अशी ही दोन्ही झुडपे सांबर, चितळ किंवा इतर हरीण खात नसल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले मांसाहारी प्राणी त्या भागात दिसत नव्हते.

शासनाने स्थापन केलेल्या समितीतील प्राचार्य डॉ. एस.एन. भुस्कुटे म्हणाले, गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये या भागातील जैवविविधतेवर परिणाम झाल्याचे लक्षात आले. बाहेरून झुडपे आली म्हणजे ती सुखासुखी आलेली नाहीत, तर त्यांचे वाईट गुणधर्मही घेऊन आली आहे. शिवाय, त्यांना नष्ट करणे म्हणजे उपटून फेकणे एवढेच नव्हे, तर यासाठी त्यांना फुले व फळे येण्याच्या आत त्यांचा नायनाट करावा लागतो.

(पूर्वार्ध)