लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नागपुरातील सर्वात जुन्या मेयो रुग्णालयात मध्य, पूर्व, दक्षीण नागपूरसह इतरही भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. या रुग्णालयाच्या शेजारी एक मेट्रो स्टेशनही आहे. या मेट्रो स्टेशनला नवीन नियोजनामध्ये मेयो रुग्णालयाशी जोडून घ्यावे, अशा सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्या.

मेयो हॉस्पिटल येथे रुग्णसेवेकरिता ५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच नवीन शव चिकित्सा गृह, प्रतिक्षा गृह, रुग्ण विभागाचा विस्तारित नोंदणी कक्षाच्या इमारतींचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी पुढे म्हणाले, मेयो रुग्णालयातील नवीन नियोजनात शेजारच्या मेट्रो स्टेशनला हॉस्पिटल जोडून घ्यावे; जेणेकरून रुग्णांना खासगी वाहनाने येण्याची गरज पडणार नाही.

आणखी वाचा-‘‘लहान पक्ष संपवा, पदाधिकाऱ्यांना भाजपात आणा,” प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

‘मेयो हे नागपूरच्या इतिहासातील सर्वात जुने हॉस्पिटल आहे. पूर्व, उत्तर, मध्य नागपुरातील गरीब रुग्ण याठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. येथे ५०० खाटांच्या खाटांचे रुग्णालय भविष्यात उभे होईल, तेव्हा मोठ्या प्रमाणात गरिबांची सेवा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आयुष्यमान भारत योजनेचाही रुग्णांना लाभ मिळत आहेच. नवीन इमारतीमध्ये उत्तम सोयीसुविधा, पार्किंगची व्यवस्था, चोवीस तास पाणी, विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधायुक्त वसतीगृह, डॉक्टरांची निवास व्यवस्था आदींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.’ नागपुरातील तापमानाचा विचार करता संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित राहील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही गडकरी यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. रहदारीच्या सोयीसाठी हॉस्पिटलपुढील रस्ता चारपदरी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘सिकलसेलच्या रुग्णांचा विचार करा’

सिकलसेल, थॅलेसिमिया ही नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भासाठी चिंतेची बाब आहे. मेडिकल, मेयो, एम्स हे रुग्णालयांनी मिळून सिकलसेल व थॅलेसिमियावरील अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार करावा. अवयव प्रत्यारोपण ते सिकलसेलपर्यंतच्या सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचाराची सुविधा असावी, अशी सूचना गडकरी यांनी केली. त्याचवेळी रुग्णालयाच्या परिसरात कोणत्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत, यासंदर्भात माहिती घेऊन त्यादृष्टीने उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याचीही सूचना त्यांनी केली.

आणखी वाचा-सत्ताधारी आमदाराला धमकी, पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई; आमदार अमोल मिटकरी म्हणतात…

५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन

५०० खाटांच्या इमारतीमध्ये उच्च दर्जाचे अपघात विभाग तसेच आठ प्रकारचे अतिदक्षता विभाग, लहान मुलांकरिता विशेष उपचार, सुसज्ज माता व बालरोग विभाग, सात शस्त्रक्रियागृहे, तसेच मध्यवर्ती प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग या सुविधा उपलब्ध असणार आहेत. रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार घेता येणार आहेत. १४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून याअंतर्गत ११ मजली इमारत उभी होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkaris suggestion says connect metro station to mayo hospital in nagpur mnb 82 mrj
Show comments