महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्यांच्या ॲपवरून पारा जास्त असलेल्या सौंदर्य प्रसाधन क्रिमची सर्रास विक्री होत आहे. खुल्या बाजारातही हे क्रिम मिळते. नागपुरातील या क्रिमच्या वापराने एका तरुणीला मूत्रपिंडाचा कर्करोग जडला. या क्रिममध्ये पाऱ्याचे प्रमाण सहा हजार पट जास्त होते. द नेफ्रोलॉजी सोसायटी या प्रकारच्या क्रिमबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करणार आहे.

नागपूरसह देशभरात सध्या विविध ई कॉमर्स कंपन्यांच्या ॲपवरून रोज हजारो वस्तूंची कोट्यवधींची उलाढाल होते. त्यात त्वचा उजळण्याचा दावा करणाऱ्या सौंदर्य प्रसाधन क्रिमचाही समावेश आहे. या क्रिममध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहे, हे तपासले जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे. खुल्या बाजारातही या कंपनीचे क्रिम उपलब्ध आहे. नागपुरातील एका तरुणीला त्वचा उजळणारे क्रिम लावून चक्क मूत्रपिंडाचा कर्करोग जडला.

आणखी वाचा-‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

सदर तरुणी अत्यवस्थ अवस्थेत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अखत्यारित असलेल्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात जुलै २०२३ मध्ये दाखल झाली होती. येथे मूत्रपिंड विभागात विविध तपासणीत तिच्या लघवीत प्राथिनांचे प्रमाण तेरा पट जास्त म्हणजे १३ ग्रॅम/ दिवस होते. हे सामान्यत: ०.३ ग्रॅम/ दिवस असते. डॉक्टरांनी तरुणीचा इतिहास घेतला असता तिने काही आठवड्यांपासून एक त्वचा उजळणारे क्रिम वापरणे सुरू केल्याचे सांगितले. हे क्रिम मागवून ते डॉक्टरांनी सप्टेंबर २०२३ दरम्यान प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले गेले. या क्रिममध्ये पाऱ्याचे प्रमाण (मर्क्युरी) ५ हजार ७०२ पीपीएम निघाले. हे पाऱ्याचे प्रमाण अपेक्षित असलेल्या निकषाहून सहा हजार पट जास्त होते. त्यानंतर या रुग्णावर शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीचे उपचार झाले. त्यामुळे तरुणी थोडक्यात बचावली. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाने प्रकरणाचे गांभीर्य बघत त्याची रितसर शोध प्रबंध तयार केला आहे. तो आंतराष्ट्रीय जनरलसाठी पाठवण्यातही आला आहे. नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून हे प्रकरण द नेफ्रोलॉजी सोसायटीच्या नागपूर शाखेने उचलले आहे. या मूत्रपिंड तज्ज्ञांच्या संघटनेकडून या विषयावर जनजागृतीही सुरू केली आहे.

आणखी वाचा-भाजप उमेदवाराचे मुस्लीम बंधुना मतांसाठी साकडे, इफ्तार पार्टीत…

पाऱ्याचे प्रमाण खूपच जास्त असलेल्या क्रिमच्या वापरामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग झालेली तरुणी नागपुरातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचाराला आली होती. डॉक्टरांच्या प्रयत्नाने ती बचावली. या विषयाचे शोध प्रबंध आंतरराष्ट्रीय जनरलसाठी पाठवले आहे. या पद्धतीने कोणतेही अनोळखी क्रिम वापरणे चुकीचे आहे. -डॉ. पंकज जावंघिया, सहयोगी प्राध्यापक, मूत्रपिंड विभाग, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर.

गोरे दिसण्याच्या लालसेपोटी नागरिक सवलतीच्या आमिषात कोणतेही त्वचा उजळणारे क्रिम खरेदी करून वापरतात. या क्रिममध्ये पाऱ्यासह इतरही शरीराला घातक घटक असण्याचा धोका आहे. या क्रिमवर सक्तीने त्यातील घटक नमूद करण्याची गरज आहे. नागपुरातील प्रकरणाची संघटनेकडून एफडीएकडे तक्रार केली जाईल. -डॉ. मोनाली शाहू, अध्यक्ष, द नेफ्रोलॉजी सोसायटी, नागपूर शाखा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Using skin lightening cream can cause kidney cancer mnb 82 mrj