|| देवेश गोंडाणे

संजय-अनुप्रिताच्या आयुष्यात रोजच ‘व्हेलेन्टाईन डे’

नागपूर : दहावीचे दिव्य पार करून ते ‘ते’ दोघे नुकतेच कॉलेजात आले होते. तशी ओळख जुनीच होती.. अगदी बालपणापासून. पण, या ओळखीला प्रेमाची हळवी किनार आहे हे जाणवायला मात्र इयत्ता अकरावी गाठावी लागली. दिवस कॉलेजचे होते.. फुलपाखरांसारखे रंगीबेरंगी. या रंगात एक रंग प्रेमाचाही होता. त्याने प्रेमरंगात रंगलेला एक लालबुंद गुलाब थरथरत्या हाताने तिच्यासमोर धरला अन् तिनेही तितक्याच प्रेमाने तो गुलाब स्वीकारण्यासाठी त्याच्या थरथरत्या हाताखाली आपली आश्वस्त ओंजळ पुढे केली. प्रेम प्रामाणिक आणि निर्धार पक्का होता. पण, जालीम जमाना आडवा आला. जात, धर्माच्या भिंती उभ्या झाल्या. या दोघांनी त्या भेदून सहजीवनाची वाट धरली. तब्बल २५ वर्षे संसार केला. पण, संघर्षांच्या या काळात ‘सप्तपदी’ राहून गेली होती. अखेर डिसेंबर २०१९ मध्ये दोघांवर जीवलगांच्या साक्षीने अक्षता पडल्या. तेव्हा दोघांच्या मधात अंतरपाट धरणाऱ्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ‘व्हेलेन्टाईन डे’च्या निमित्ताने संजय-अनुप्रिताने त्यांच्या अजब प्रेमाची ही गजब कथा ‘लोकसत्ता’ला सांगितली..

डॉ. अनुप्रिता आणि संजय हे दोघेही बालपणीचे मित्र. एकमेकांचे शेजारी असल्याने दोघांची घनिष्ठ मैत्री होती. त्या मैत्रीतूनच जसे संजयच्या मनात प्रेमांकुर फुलायला लागले, तसेच अनुप्रिताच्याही मनातही. अकरावीला असताना संजयने १४ एप्रिल १९८६ ला अनुप्रिताला प्रेमाच प्रस्ताव दिला. तिनेही तो मान्य केला. तारुण्याच्या उंबरठय़ावर रंगलेल्या या प्रेमाला संघर्षांतून यशस्वी करण्याच्या दोघांनीही आणाभाका घेतल्या. मात्र, दोघांच्या प्रेमाची कुजबूज अनुप्रिता यांच्या घरच्यांना लागली. आई, बाबा, भाऊ सगळ्यांचाच या प्रेमाला तीव्र विरोध. शेवटी अनुप्रिताला रायपूरला मावशीकडे पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले. घरातील सगळे फोन बंद  झाले. संजय रात्री नागपूरवरून निघून पहाटे सात वाजता रायपूरला अनुप्रिताच्या महाविद्यालयाच्या गेटसमोर उभा राहायचा. तिकडे अनुप्रिताच्या लग्नाची तयारी सुरू झाली. अखेर ६ डिसेंबर १९९३ ला पळून जाऊन दोघांनीही चंद्रपूर येथील न्यायालयात लग्न केले. अनुप्रिताच्या घरच्यांचा विरोध कायम होताच. घरच्यांनी मात्र दोघांचाही स्वीकार केला. येणाऱ्या प्रत्येक संघर्षांला पार करीत अनुप्रिता आणि संजय या दोघांनीही स्वत:ला सिद्ध करून दाखवले. डॉ. अनुप्रिता लता मंगेशकर रुग्णालयामध्ये होमिओपॅथी डॉक्टर तर संजयचा बांधकाम व्यवसाय आहे. मोठा मुलगा शंतनू याने न्यूयार्क येथील विद्यापीठामधून एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले. मुलगी ऋषिका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षांला आहे.  सगळे व्यवस्थित पार पडत असतानाही २५ वर्षांपूर्वी सन्मानाने विवाह करण्याची इच्छा मागे पडली होती. अनुप्रिताच्या घरच्यांनी आजही स्वीकारले नाहीच. पण, मुलेच माहेरचा आभास देत होती. अखेर मुलेच पालक झाली, त्यांनीच अंतरपाट धरला आणि ‘सप्तपदी‘चा हा अनुपम  सोहळा उत्साहाने पार पडला. पाहिला विवाह न्यायासनासमोर पार पडला आणि दुसरा समाजमान्य पद्धतीने.

प्रेम म्हणजे गंमत नव्हे

आम्ही दोघेही खूप समाधानी असून असंख्य संकटे आली तरी प्रेमरूपी धाग्याने आम्हाला आजही एकत्र बांधून ठेवले आहे. हल्लीची पिढी प्रेम या शब्दातील भावनांबद्दल गल्लत करते. परंतु, प्रेम म्हणजे गंमत नव्हे. ती प्रामाणिक भावना आहे. एका हृदयातून दुसऱ्या हृदयात पोहोचणारी. ती या पिढीने जपावी असा संदेश आम्ही व्हेलेन्टाईन डेच्या निमित्त देऊ इच्छितो. – संजय-डॉ. अनुप्रिता भडागे