नागपूर : पोलीस दलात भरती होऊन समाजाचे रक्षण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून २२ वर्षीय तरुणी मैदानावर घाम गाळत होती. तिच्या परीश्रमाला यशही मिळाले. तिची पोलीस दलात निवड झाली. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी मैत्रिणीने तिच्यावर चोरीचा आळ घेऊन पोलिसांत तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याने निवड हुकल्याने ती नैराश्यात गेली. कुटुंबियांची जबाबदारी असलेल्या तरुणीवर चक्क देहव्यापार करण्याची वेळ आली. नुकताच प्रतापनगरातील एका ब्युटीपार्लरवर घातलेल्या छाप्यात तिली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

प्रतापनगरात राहणारी संजना (बदललेले नाव) वयाच्या १९ व्या वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत होती. तिच्या कुटुंबियांमध्ये दोन बहिणी आणि आईवडील. लहान बहिणीचे शिक्षण आणि आईवडिलांच्या औषधाचा खर्च भागविण्यासाठी ती एका झेरॉक्सच्या दुकानावर काम करायला लागली. तिने स्वत: पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सकाळीच उठून ती मैदानावर सराव करायला जात होती. तसेच तिने काही मैत्रिणींच्या मदतीने अभ्यासही सुरु केला होता. मुलगी पोलीस दलात नोकरीवर लागल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती सुधरेल, अशी आशा आई-वडिलांना होती. दरम्यान, मनाप्रमाणेच घडले. संजनाची पहिल्याच प्रयत्नात शारीरिक चाचणीत निवड झाली. तसेच लेखी परिक्षेतही तिने बाजी मारली. संजनाची पोलीस दलात निवड झाल्याने आईवडिलांचा आनंद गगनात मावेना.

हेही वाचा…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?

काही दिवसांतच पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी जायचे असल्याने तिने तयारी सुरु केली. मात्र, यादरम्यान, तिच्या मैत्रिणीच्या घरी चोरी झाली. काही दागिने चोरल्याचा आरोप संजना आणि तिच्या मैत्रिणीवर घेण्यात आला. मैत्रिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, संजनाला फसविण्यात येत असल्याचे तिने वारंवार पोलिसांना आणि कुटुंबियांना सांगितले. गुन्हा दाखल झाल्यामुळे संजनाची पोलीस दलातील निवड हुकली. शासकीय नोकरीची संधी गेल्यामुळे ती नैराश्यात गेली.

संजनावर देहव्यापार करण्याची वेळ

नैराश्यात गेलेल्या संजनाने बरेच दिवस स्वत:ला घरात कोंडून घेतले. मात्र, घरातील बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता तिच्यावर पुन्हा अर्थार्जनासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली. तिने प्रतापनगरातील एका ब्युटी पार्लर आणि स्पामध्ये काम करणे सुरु केले. मात्र, या स्पामध्ये काही तरुणी चक्क देहव्यापार करीत होत्या. स्पा सेंटरच्या मालकीनने संजनाला जाळ्यात ओढले. तिला पगार वाढवून देण्याचे आमिष दा‌खवून देहव्यापारात ओढले. घरची परिस्थिती सुधारेल म्हणून तिनेसुद्धा हा व्यवसाय स्वीकारला. गेल्या काही महिन्यांपासून ती अनेक आंबटशौकीन ग्राहकांच्या संपर्कात आली.

हेही वाचा…video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर

पोलिसांच्या छाप्यात तरुणी ताब्यात

गेल्या तीन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने प्रतापनगरातील एका ब्युटी पार्लरवर छापा घातला. त्यामध्ये संजना ही एका आंबटशौकीन ग्राहकासोबत आढळून आली. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. उच्चशिक्षित असल्याचे कळताच पोलिसांनी तिची विचारपूस केली. तिने आर्थिक परिस्थितीमुळे देहव्यापार करीत असल्याचे पोलिसांना सांगितले.