जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागातील कर्मचाऱ्यानेच एका १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. दिंडोरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गोरख मधुकर शेखरे (२५, रा़. टेलिफोन कॉलनी, दिंडोरी) असे या अत्याचार करणार्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोरख हा सध्या मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून सुटीनिमित्त तो काही दिवसांपूर्वीच गावी आला आहे. गोरख याने मोहाडी येथील एका अल्पवयीन मुलीवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अत्याचार केला़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख हा दिंडोरीजवळील मोहाडी येथे आला होता. सोमवारी (ता.३) रात्रीच्या सुमारास पीडित मुलगी घरातील ओट्यावर भांडी घासत होती. त्याचवेळी गोरखने तिचे तोंड दाबून बाथरूममध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मदतीसाठी या मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ व कुटुंबीय; तसेच शेजारच्यांनी धाव घेतली. त्यांनी मुलीची गोरखच्या तावडीतून सुटका केली. तसेच त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीने या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोरखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिंडोरीचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत़. दरम्यान, गोरख याला मंगळवारी (ता. ४) सकाळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता शुक्रवारपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 8:19 pm