शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ७४०, तर जिल्ह्यात ३९ कनिष्ठ महाविद्यालयात २४८० जागा उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन अधिकाधिक युवकांना रोजगार, स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने ७० टक्के व्यवसाय शिक्षण आणि ३० टक्के सामान्य शिक्षण अंतर्भूत असलेले किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. सहा वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाचे नाव बदलून ते उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षणक्रम (एचएससी व्होकेशनल) असे करण्यात आले. औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार व आधुनिक उच्च तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली. चालू शैक्षणिक वर्षांपासून अकरावीला नवीन सुधारित अभ्यासक्रम असल्याची माहिती महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनने दिली आहे. नाशिक शहरात शासकीय तांत्रिक विद्यालयात ६०, केटीएचएम महाविद्यालय ८०, जनता विद्यालय (सातपूर) ८०, एसव्हीकेटी देवळाली कॅम्प ६०, बीवायके महाविद्यालय १००, आरएनसी (बिटको) नाशिकरोड ६०, पुरुषोत्तम-आरंभ नाशिकरोड ६०, एमएमआरके महिला महाविद्यालय ४०, हिरे महाविद्यालय (पंचवटी) ८०, के. जे. मेहता नाशिकरोड ६०, एचपीटी महाविद्यालय ६० अशा एकूण ३७ अभ्यासक्रमांच्या ७४० जागा उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या एका तुकडीत २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांची मागणी असल्यास अधिकच्या पाच जागांवर संस्थांना प्रवेश देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अभियांत्रिकी गटातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी गटातील विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी पदविकेच्या थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळतो. शहरात कला शाखेच्या ४२४०, विज्ञान शाखेच्या ७०८०, वाणिज्य शाखेच्या ६२८० आणि व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या ७४० अशा एकूण १८ हजार ३४० जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया १५ जूनपासून सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यात ३९ कनिष्ठ महाविद्यालयात (अनुदानित) व्यवसाय अभ्यासक्रमाच्या १२४ तुकडय़ा असून त्यांची अकरावीची प्रवेश क्षमता २४८० इतकी आहे. या बाबतची माहिती संघटनेचे सचिव डी. आर. मुरकुटे यांनी दिली.