News Flash

नाशिक विभागातून भेसळयुक्त ३५ हजार किलो साठा जप्त

दिवाळीनिमित्त सध्या मिठाईची दुकाने विविध खाद्यपदार्थानी सजली आहेत.

 

अन्न व औषध प्रशासन विभागाची २९ विक्रेत्यांवर कारवाई

सणोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने विभागातील अन्न पदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांकडील माल तपासणीच्या राबविलेल्या विशेष मोहिमेत २९ ठिकाणी कारवाई करत अन्न पदार्थाचा ३५ हजार किलोहून अधिकचा साठा जप्त केला. १८९ पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. सणोत्सवात मिठाई, तेल, तूप वा तत्सम पदार्थ खरेदी करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त सध्या मिठाईची दुकाने विविध खाद्यपदार्थानी सजली आहेत. या काळात घरोघरी फराळ बनविण्यासाठी तूप, तेल व तत्सम पदार्थाची मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते. ही संधी साधून भेसळयुक्त वा कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जाऊ शकतात. त्यास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून अन्न व औषध प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत खवा, मावा, बर्फी, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप आदी अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. नाशिक विभागात खवा, मावा व मिठाईचे ८५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. त्यापैकी १२ ठिकाणांहून १२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा १० हजार ५९८ किलो साठा जप्त करण्यात आला. खाद्यतेल, वनस्पती तुपाचे १०४ नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी १७ ठिकाणी कारवाई करून सुमारे २५ हजार किलो साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत ४४ लाख रुपयांहून अधिक आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी मिठाई ताजी असल्याची खात्री करून खरेदी करावी. माव्यापासून तयार केलेली मिठाई २४ तासांच्या आत तर बंगाली व तत्सम मिठाई आठ ते दहा तासांच्या आत सेवन करावी. खराब मिठाई नष्ट करावी. तेल-तूप खरेदी करताना त्यावरील दिनांक पाहूनच खरेदी करावे. अन्नपदार्थ खरेदी करताना काही शंका असल्यास अन्न व औषध कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त उ. शं. वंजारी यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 4:13 am

Web Title: 35 thousand kg of adulterated stocks seized from nashik division
Next Stories
1 शिक्षणाची नैतिक मूल्य जोपासा
2 राज्यपाल येती घरा..
3 जळगाव, धुळ्यात खडसे, भामरे, महाजन यांची प्रतिष्ठा पणाला!
Just Now!
X