माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अथक प्रयत्न सुरू असले तरी ग्रामीण भागात त्यावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभाग कमी पडत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ वर्षांतील माता मृत्यूचा ७१ ही संख्या त्याचे निदर्शक आहे. गरोदरपणातील माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवताना अनाथ झालेल्या बालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या ‘अनाथांचा नाथ संत निवृत्तीनाथ महाराज’ या योजनेत आतापर्यंत ५० नवजात बालकांना समाविष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने सरकारी योजनांच्या माध्यमातून माता-बालमृत्यु प्रमाण कमी व्हावे यासाठी जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना यासह ० ते ६ वयोगटातील बालकांमधील कुपोषण कमी व्हावे यासाठी एकात्मिक बाल विकासच्या माध्यमातून उपक्रम सुरू आहेत. या योजनांना ग्रामीण भागात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आजही माता-बाल मृत्यूच्या घटना समोर येतात. जिल्ह्यात गत वर्षी ६२ महिला प्रसुती काळात दगावल्या. आकडेवारीच्या भाषेत हा दर ७१ असा राहिला. माता मृत्यूनंतर नवजात शिशुचे पालनपोषण हा कुटुंबियांसमोर प्रश्न असतो. त्याला इतर नातेवाईकांनी सांभाळले तरी ‘स्वामी तिन्ही जगांचा, आईविना भिकारी’ या उक्तीप्रमाणे बालक अनाथ असते. स्थानिक पातळीवरील ही स्थिती लक्षात घेऊन तत्कालीन माता बालसंगोपन अधिकारी डॉ. योगेश साळी यांच्या संकल्पनेतून ‘अनाथांचा नाथ संत निवृत्तीनाथ महाराज’ या योजना आकारास आली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत परिषदेस मिळणारे भाडेतत्वावरील मालमत्तेचे उत्पन्न तसेच अन्य काही निधीतून यासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. सुरूवातीला बालकांच्या नावे पाच हजाराची रक्कम टपाल खात्यात जमा करण्यात येत होती. यंदापासून ही रक्कम १० हजार करण्यात आली. बालक ज्या वेळी वयाची १८ वर्षे पूर्ण करेल, त्या वेळी त्या बालकास ही रक्कम व्याजासह परत करण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यांदाच स्थानिक पातळीवर ही योजना राबविली जात असून आतापर्यंत २०१२-१३ वर्षांत २२, २०१३-२०१४ मध्ये १०, २०१४-२०१५ मध्ये ७ आणि २०१५-२०१६ मध्ये ११ नवजात बालकांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने टपाल खात्यात संबंधितांच्या नावे ही रक्कम जमा केली असून योग्य वेळी त्यांना ती सुपूर्द करण्यात येईल असे आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी सांगितले.