नाशिक : कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याने सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची  धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी पेठ रस्त्यावरील कर्णनगर परिसरात घडली. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वडील स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले.

नामको रुग्णालयामागील राजमंदिर सोसायटीत हा प्रकार घडला. पोलीस नाईक संजय भोये हे उपनगर ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे सावत्र मुलांशी काही कौटुंबिक वाद होते. दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी हे वाद पुन्हा उफाळून आले. यावेळी भोये यांनी आपल्या सरकारी पिस्तुलातून अभिषेक चिखलकर (२५) आणि शुभम चिखलकर (२२) या आपल्या सावत्र मुलांवर चार गोळ्या झाडल्या. वडिलांनी पिस्तूल काढल्याचे पाहून एक जण जीव वाचविण्यासाठी स्नानगृहात पळाला. त्याच्यावर तिथे जाऊन वडिलांनी गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेकला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रथमदर्शनी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा अंदाज नांगरे पाटील यांनी व्यक्त केला. इमारतीतील सदनिका आजोबांनी आईला दिलेली आहे. ती सदनिका आमच्या नांवावर करावी, अशी मुलांची मागणी होती. यातून उभयतांमध्ये वाद होऊन ही घटना घडल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, गोळीबारानंतर संशयित भोये स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. मयत अभिषेक र्मचट नेव्हीमध्ये नोकरीस होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.