जिल्ह्यत दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये सहा जण जागीच ठार झाले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बहुतांश अपघातात संशयित वाहन चालक फरार आहेत. म्हणजे, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्याचे औदार्यही संबंधितांनी दाखविले नाही.
सायखेडा येथील भेंडाळी-सायखेडा रस्त्यावर जगदिश नवले (नाशिक) इनोव्हा कारने निघाले होते. यावेळी नियंत्रण सुटल्याने त्यांच्या मोटारीने पायी जाणाऱ्या अभय हांडोरे (११, शिंदेवाडी, सिन्नर) या मुलास जोरदार धडक दिली. त्यात अभयचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरा अपघात नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर घडला. न्यायडोंगरी येथील किरण बाळू पाटील पंपावर गाडीत पेट्रोल टाकून बाहेर पडले. वेगात गाडी वळवताना ती घसरली आणि त्यांच्या डोक्यास व छातीस मार बसला. धुळे येथे दाखल केले असता उपचारादरम्यान पाटील यांचा मृत्यू झाला. तिसरा अपघात खेड-भंडारदरा रस्त्यावर घडला. भगवान घोरपडे (४५) हे मित्र अंकुश जंगले याच्या सोबत दुचाकीवर निघाले होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी आदळली आणि त्यात भगवान व अंकुश हे ठार झाले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. वणी-सापुतारा रस्त्यावर दुचाकीने पादचाऱ्याला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. वणी येथील सापुतारा रोडवरील हॉटेल मनोरंजन समोर हा अपघात झाला. त्यात भास्कर खांबाईत (उंबरपाडा, सुरगाणा) यांचा मृत्यू झाला. यावेळी वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड तालुक्यातील नैताळे परिसरात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाबासाहेब दाते यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतरही चालकाने पलायन केले. दरम्यान, मालेगाव-मनमाड रस्त्यावर खासगी प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. त्यात तीन प्रवासी जखमी झाले. शहादा येथील सोनल बईन यांनी वाहनचालक सागर चित्तेविरुध्द मालेगाव पोलिसात तक्रार दिली आहे.