कृषिमंत्री दादा भुसे यांचा इशारा

नाशिक : पीक कर्जाचा पुरवठा वेळेत झाल्यास जिल्ह्यातील बँकांची कामगिरी आणि विश्वासार्हता दिसून येईल. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नाशिक जिल्हा बँकेला ८७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेतील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कृषी, करोना साथरोग आणि अन्य विभागांच्या आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.  शेतकऱ्यांना चिंतामुक्त आणि सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पिकांची गुणवत्ता नियंत्रणसाठी जिल्ह्यात भरारी पथके आणि तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकरी शेतीशाळांचे नियोजन, मेंढींवरील लंगडय़ा आजारावर उपाय योजना केल्या जात असल्याचे भुसे यांनी सांगितले. खरीप पीक हंगामासाठी सध्या पोषक वातावरण असून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि शेती अवाजारे खरेदीसाठी वित्तीय उपलब्धीची आवश्यकता असते. म्हणून शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आठवडाभरात निधी उपलब्ध करून, शेतकऱ्यांच्या पीक विमा कर्ज आणि इतर कर्ज खात्यावर परस्पर जमा न करता त्यांना थेट त्याचा लाभ देण्यात यावा, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार भारती पवार, आ. दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, समाजकल्याण समिती सभापती सुशिला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संख्या कमी असल्यास रुग्णांचे स्थलांतर

आरोग्य विभागाचा आढावा घेतांना दादा भुसे यांनी ज्या तालुक्यांमध्ये करोना रूग्णांची संख्या कमी आहे, तेथे स्वतंत्र आरोग्य यंत्रणा न राबविता रूग्णांना लगतचा तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करावे, जेणेकरून ही आरोग्य यंत्रणा इतर ठिकाणी सेवा देवू शकतील. तसेच ग्रामपंचायतींच्या समन्वयाने गावपातळीवर करोना रूग्ण तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करावे. करोना झालेल्या रूग्णांची मानसिकता खचते, अशा वेळी रुग्णांना सकारात्मक मानसिक बळ देऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रूग्णांसाठी मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात, असेही भुसे यांनी नमूद केले.