नियम मोडणाऱ्यांकडून एक लाखांहून अधिकचा महसूल जमा

नाशिक : करोना साखळी खंडित करण्यासाठी पोलीस आयुक्तांसह अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले असताना नागरिक मात्र स्वैरसंचार करत आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी पाच रुपये घेणे सुरू के ले असतानाही नागरिक या व्यवस्थेस जुमानत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे व्यावसायिकांना या नियमाचा फटका बसत असल्याची तक्रोर आहे. या कारवाईत आतापर्यंत एक लाखाहून अधिकचा महसूल तसेच नियम मोडणाऱ्यांकडून दंड आकारण्यात आला आहे.

शहर परिसरात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असताना पोलीस तसेच महापालिकेने संयुक्त नियोजन करून शहरातील बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी एक तासाकरिता पाच रुपये शुल्क आकारणी सुरू के ली. नेपाळी कॉर्नर, धुमाळ पॉइंट, बादशाही कॉर्नर या ठिकाणाहून प्रवेश करणाऱ्या नागरिकांकडून शुल्क आकारण्यात आल्याचा दावा पोलीस करत आहे. बुधवारी नेपाळी कॉर्नर येथे पोलीस नसल्याने नागरिक पावती न फाडता थेट घुसखोरी करत होते. दुसरीकडे, बादशाही कॉर्नर तसेच धुमाळ पॉइंट येथे नागरिकांकडून पावती फाडूनच  प्रवेश दिला जात होता.

महात्मा गांधी रोड परिसरात भ्रमणध्वनीसह अन्य दुकाने आहेत. या ठिकाणीही पोलीस तसेच महापालिके च्या वतीने प्रवेशासाठी पाच रुपये घेणे सुरू करण्यात आले आहे. शुल्काची पावती फाडण्यासाठी लोकांनी गर्दी के ली. यामध्ये अनेकांनी पावती न फाडताच घुसखोरी के ली. पावती फाडण्यासाठी लागणारा वेळ, ग्राहकांच्या लागलेल्या रांगा यामुळे दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.

या कालावधीत महापालिकेचे पावती पुस्तक  संपल्याने दुकानदारांना दुकान बंद करणे भाग पडले. पावती फाडण्यासाठी ग्राहक रांगा लावतात, तर त्यावेळेस त्यांच्या सोबत येणारे खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

समोर गर्दी असली तरी ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विक्रे त्यांचे म्हणणे आहे. एरवी दुपापर्यंत तीन हजार रुपयांचा व्यवसाय होतो. पावतीच्या नादात दुपापर्यंत बोहणीही झाली नसल्याची अगतिकता विक्रे त्यांनी व्यक्त के ली. नवीन नाशिक येथील पवननगर परिसरातही पावती फाडत प्रवेश सुरू होता. त्रिमूर्ती चौक येथे भाजीबाजार परिसरात दुभाजक टाकू न रस्ता अडविण्यात आला. नाशिकरोड येथेही उड्डाणपुलाखाली भाजीबाजार, देवी चौक, वास्को चौक आणि  पालिका कार्यालयालगत फळबाजारात जाण्यासाठी पावती फाडण्यात येणार आहे.

दरम्यान, पावती फाडण्याच्या माध्यमातून १२०० जणांकडून शुल्क आकारण्यात आले आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखत नियमांचे पालन करावे. जेणेकरून टाळेबंदीची वेळ येणार नाही,

असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिला. शहर परिसरात सामाजिक अंतर नियमांचे पालन न करणे, मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून लाखोंचा दंड आकारण्यात आला आहे.

तीन लाखांहून  अधिक दंड वसूल

पोलिसांनी करोनाचा संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारवाई सुरू आहे. यामध्ये मुखपट्टीचा वापर न के लेल्या २४९ नागरिकांवर कारवाई करत एक लाख १५,१००, सार्वजनिक ठिकाणी थुंकले म्हणून एका संशयितावर कारवाई करत एक हजार रुपये, सामाजिक अंतर नियमांचे पालन  न के ल्यामुळे ५० जणांकडून दोन लाख १६,९०० आणि रात्री आठनंतर पाचपेक्षा जास्त लोक एकत्र आले म्हणून सहा संशयितांकडून १० हजार रुपये दंड असा तीन लाख ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.