तस्करांची क्लुप्ती उघड

नाशिक : मद्याच्या तस्करीसाठी महागडय़ा वाहनाचा वापर होत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत उघड झाले. अलिशान सफारी वाहनात चोरकप्पे तयार करून राज्यात बंदी असणाऱ्या मद्याची वाहतूक केली जात होती. पथकाने पाठलाग केल्यावर तस्करांनी वाहन सोडून पलायन केले. या कारवाईत वाहनासह मद्य असा सुमारे साडेआठ लाखांचा मद्यसाठा हाती लागला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी क्रमांक एकने ही कारवाई केली. या पथकाचे दुय्यक निरीक्षक अरुण सुत्रावे यांना अलिशान मोटारीतून मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक डॉ. मनोहर अचुंळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बुधवारी पहाटे तस्करांच्या मागावर होते. पथक मागावर असल्याचे लक्षात येताच चालक आणि तस्करांनी पेठ रोडवरील जकात नाका परिसरात आपले वाहन सोडून पळ काढला.  बेवारस सफारी पथकाच्या हाती लागली. सफारीची पथकाने तपासणी केली असता वाहनात अनेक चोरकप्पे असल्याचे आढळून आले. हे वाहन मुख्यालयात नेण्यात आले. आसनाखाली लाखोंचा मद्यसाठा आढळून आला. तस्करांनी बेकायदेशीर मद्य वाहतुकीसाठी अवलंबलेल्या पद्धतीने विभागही चक्रावला आहे. या कारवाईत आठ लाख ४२ हजार रुपये किमतीचे वाहन आणि मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी भरारी पथक तीनचे निरीक्षक एम.एन. कावळे, एस.डी. चोपडेकर, दुय्यक निरीक्षक प्रवीण मंडलिक आदींनी परिश्रम घेतले.