विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन

नाशिक : वळण योजनांमुळे पहिल्या टप्प्यात दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण भरते. या योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकदरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.

दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीने उभारलेल्या व्यापारी संकुलाच्या लोकार्पणप्रसंगी झिरवाळ बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ हेही उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुल या दोन्ही व्यापारी संकुलांमुळे जानोरीच्या विकासात भर पडली असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी जानोरी ग्रामपंचायतीने ग्रामनिधी योजनेच्या माध्यमातून व्यापारी संकुल इमारत उभारल्याचा गौरवपूर्ण उल्लेख के ला. नाशिक जिल्ह्यत पाऊस कमी असल्याने धरणात पाणी कमी आहे. पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यवर असून पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी के ले. करोनापासून आपले कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका सांभाळा म्हणजेच जिल्हा आणि राज्य सांभाळले जाईल. आयएसओ मान्यताप्राप्त जानोरी ग्रामपंचायत नेहमी विकासाला प्राधान्य देणारी आहे. त्यामुळे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वच्छतेला प्राधान्य देतात. जानोरी गाव विमानतळाजवळ असल्याने येथील गावकऱ्यांनी शेतीसोबत उद्योगधंद्यांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते करोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांना दोन हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करुन सत्कार करण्यात आला.

यावेळी दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, दिंडोरी उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सरपंच संगीता सरनाईक उपसरपंच गणेश तिडके, विस्तार अधिकारी आण्णा गोपाळ आदी उपस्थित होते.