16 December 2019

News Flash

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांची संख्या वाढली

पक्ष्यांची वाढती संख्या पाहता अभयारण्य परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.

१८ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद, डिसेंबरअखेर संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता

नाशिक : थंडीचा जोर वाढू लागला असताना धुक्याने भरलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातील वेगवेगळ्या पक्ष्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात सद्य:स्थितीत १८ हजार २८४ पक्षांची नोंद करण्यात आली असून डिसेंबरअखेर हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात थंडीची चाहूल लागताच देश-विदेशातील पक्षी स्थलांतर करून येतात. यंदा अवकाळी पावसामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना जिल्ह्य़ातील या अभयारण्याला मात्र हे वातावरण पोषक ठरले. सर्वत्र पाणी असल्याने पक्ष्यांना आवश्यक खाद्य मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झाल्याने पक्ष्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा प्रत्यय पक्षी गणनेत येत आहे.

नोव्हेंबर महिन्याची पक्षी गणना वनअधिकारी, कर्मचारी, पक्षीमित्र, स्थानिक मार्गदर्शक, वन्यजीव अभ्यासक, स्वयंसेवक यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आली. या प्रगणनेत चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव या पाच ठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात आले. विविध पाणपक्षी, झाडांवरील पक्षी यांच्या नोंदी या ठिकाणी घेण्यात आल्या. यामध्ये १६ हजार ९८५ पाणपक्षी आणि एक हजार ३२६ झाडांवरील, गवताळ भागातील असे १८,२८४ अशी पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.

या प्रगणनेत वारकरी, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, गढवाल, फ्लेमिंगो, ब्राम्हणी बदक, कॉमन पोचार्ड, विजन, लिटल क्रेक, बेलन्स क्रेक, स्पूनबिल, रिव्हर टर्न, नकटा बदक, टफ्टेड पोचार्ड, कमळपक्षी, शेकाटय़ा, कॉमन क्रेन आदी पक्षी आढळून आले आहेत. यंदा पहिल्यांदाच काळटोप खंडय़ाचे प्रथमच दर्शन झाले असून कॉमन क्रेनची संख्या वाढली. राजा मोर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असताना वेगवेगळ्या पक्ष्यांची पिले बघावयाला मिळत आहे.

पक्ष्यांची वाढती संख्या पाहता अभयारण्य परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. शाळांच्या सहली या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर येत आहेत. पर्यटकांना अभयारण्य परिसरात सहज फिरता येईल, अशी परिस्थिती नाही. या ठिकाणी पर्यटकांना भ्रमंती करण्यासाठी करण्यात आलेला ‘नेचर ट्रेल’ पावसात वाहून गेला, काही ठिकाणी तो पूर्ण खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. तसेच पर्यटकांना पक्ष्यांची माहिती होण्यासाठी निसर्ग परिचय केंद्रावर पक्ष्यांची माहिती आणि लघुचित्रपट दाखविण्यात येत आहे. पक्षी गणनेस साहाय्यक नवसंरक्षक, वन्यजीव नांदुरमध्यमेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक अश्विनी पाटील, वनरक्षक चंद्रमणी तांबे, पक्षीमित्र प्रा. आनंद बोरा, डॉ. उत्तम डेर्ले आदी उपस्थित होते.

First Published on November 27, 2019 1:18 am

Web Title: birds increased in nandur madhmeshwar sanctuary zws 70
Just Now!
X