नाशिक : टाळेबंदीत मोठय़ा प्रमाणावर झालेले स्थलांतर पाहता राज्य परिवहनच्या वतीने जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली; परंतु करोनाच्या भीतीने प्रवासी बसने प्रवास करणे टाळत असल्याने अवघ्या चार-पाच प्रवाशांसह बस गाडय़ा धावताना दिसत आहेत.

टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित तसेच परप्रांतीयांची होणारी पायपीट प्रशासनासाठी डोकेदुखी झाली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान उभे ठाकले. स्थलांतरितांना मूळ गावी पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य परिवहनच्या मदतीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या सीमारेषेपर्यंत ही बस सेवा सुरू राहिली. परंतु जिल्ह्य़ात अडकलेले प्रवासी यामुळे अस्वस्थ झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाअंतर्गत लाल क्षेत्र सोडून बिगर लाल क्षेत्रासाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक जिल्ह्य़ात सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी पाटी कोरी असताना तीन दिवसांत हा आकडा सहा विभागांतून ३२ फेऱ्यांपर्यंत गेला. त्यातून ३८१ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. जिल्ह्य़ात सटाणा, सिन्नर, पेठ येथे बस सेवेला प्रतिसाद मिळाला आहे. सटाण्यात डांगसौंदाणे, तळवाडे, नामपूर या ठिकाणी ६५, सिन्नर परिसरात सिन्नर, लासलगाव, ठाणगांव येथे ४९, पेठ तालुक्यात हरसूल, पेठ, घुबडसाका परिसरात सर्वाधिक म्हणजे २६७ प्रवाशांनी प्रवास केला. तर येवला, पिंपळगाव, कळवण, इगतपुरी, नांदगाव, नाशिक एक आणि दोन, मालेगाव, मनमाड येथे बस धावलीच नाही.