मंगळवारी आसनगावजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या झालेल्या अपघातापाठोपाठ मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा आज (दि.३०) सलग दुसर्‍या दिवशी ठप्प झाली होती. मनमाड येथून नाशिक, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि मुंबई येथे जाण्यासाठी एकही गाडी सुटली नाही. या गाड्या बंद राहणार असल्याचे कालच प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते.

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशी ही रेल्वे स्थानकाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आज सकाळपासून नाशिक आणि मनमाड येथील बुकिंग ऑफिसच्या परिसरात तिकिट खिडक्यांवर शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, आज सकाळी येथील रेल्वे स्थानकात मुंबईला जाणार्‍या आणि मुंबईकडून येणार्‍या सर्व गाड्या पुणे-दौंड-कल्याण मार्गे धावतील असा फलकच लावण्यात आला. मात्र, चाकरमान्यांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन कालपासून मनमाडला रखडलेली जनशताब्दी एक्स्प्रेस लासलगाव, निफाड, नाशिक इगतपुरीसाठी सोडण्यात आली. या अपघातामुळे लांब पल्याच्या प्रवासी गाड्या रखडल्या असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. मात्र, मुंबईतील मुसळधार पाऊस आणि रेल्वे गाड्या बंद यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवास टाळला. त्यामुळे आज सकाळी येथील बुकिंग ऑफिसच्या परिसरात तिकिट खिडक्यांवर शुकशुकाट दिसून आला.

नाशिक मुंबईकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांसाठीच्या फलाट क्रमांक दोनवर प्रवासी नसल्याने शुकशुकाट होता. मनमाड-मुंबई पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्याने अनेक चाकरमान्यांना आज सुट्टी घ्यावी लागली. या सर्वच गाड्यांनी नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात, परराज्यातून मनमाडमार्गे मुंबईला जाणार्‍या सर्व गाड्या गेल्या दोन दिवसापांसून मनमाडहून दौंड-पुणे मार्गे मुंबईला वळवण्यात आल्या असून मुंबईहून परराज्यात जाणार्‍या गाड्यांचा मार्ग पुणे-दौंड-मनमाड असा करण्यात आला. मात्र, या मार्ग बदलामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी १० ते १५ तास अधिक मोजावे लागत आहे.

रेल्वे गाड्यांच्या या सर्व गदारोळात मनमाड-इगतपुरी शटल ही गाडी भाव खावून गेली. गेल्या दोन दिवसांपासून या गाडीच्या वेळापत्रकात कोणताही फरक पडला नाही. मनमाड ते इगतपुरीपर्यंत सर्वच स्थानकावर थांबणार्‍या या गाडीला प्रवाशांची खच्चून गर्दी होत आहे. रेल्वे वाहतूक ठप्प असल्यामुळे मनमाड बस स्थानकातून नाशिकसाठी ११ विशेष बस सोडण्यात आल्या आहेत.