वृद्ध महिलेवरही हल्ला

सिडकोतील महाकाली चौकात शुक्रवारी सकाळी मोकाट गाईंच्या हल्ल्यात सातवर्षीय शाळकरी बालक गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेपाठोपाठ याच परिसरात मोकाट गाईने वृद्ध महिलेला धडक देऊन जखमी केले. मोकाट गाईंच्या तांडवामुळे नागरिक भयग्रस्त झाले आहेत.

सिडकोसह शहरातील अनेक भागात मोकाट गाईंचे कळप मुक्तपणे फिरतात. ही मोकाट जनावरे स्थानिकांसाठी जीवघेणे संकट ठरल्याचे शुक्रवारच्या घटनेने दाखवले. साईबाबा चौकात वास्तव्यास असणाऱ्या शीतल पवार या मुलगा महेशला शाळेत सोडण्यासाठी सकाळी सात वाजता पायी निघाल्या. याचवेळी महाकाली चौकात ३० ते ३५ मोकाट गाईंनी ठिय्या दिला होता. या परिसरातून पायी जात असताना काही गाईंनी सात वर्षांच्या चिमुरडय़ावर हल्ला केला. महेशला शिंगावरून अनेकदा हवेत फेकून देण्यात आले. काही वेळात गाईंनी रौद्रावतार धारण केला. हे इतके अकस्मात घडले की आईच्या डोळ्यासमोर गाई चिमुरडय़ाला पायदळी तुडवत हवेत फेकत होत्या. हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करीत धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर महेशला गाईच्या तावडीतून सोडविण्यात आले. तोवर तो बेशुध्द पडला होता. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महेशचे डोके, छाती, पोटाला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची चर्चा सुरू असतांनाच सिडकोतच  ७५ वर्षांची महिला गाईच्या धडकेने जखमी झाली. सीताबाई ठाकरे (रा. काळे चाळ) असे या महिलेचे नाव आहे.

गाईच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला महेश पवार हा हिरे प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीत शिक्षण घेतो. ज्या ठिकाणी गाईंनी हल्ला केला, तेथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक सातत्याने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही भयावह घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला. या घटनेची जबाबदारी पालिका प्रशासनाने स्वीकारून पीडितास नुकसानभरपाई द्यावी आणि त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मोकाट गाईंचा बंदोबस्त न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जखमी झालेल्या महेशच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. आई छोटी-मोठी कामे करून चरितार्थ चालविते. महेशच्या उपचाराचा खर्च कुटुंबीय करू शकणार नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी वर्गणी जमवली. महेशच्या मेंदूला तीव्र मार लागला असून ७२ तास त्याला निरीक्षणाखाली ठेवावे लागणार आहे. अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ. वैभव महाले यांनी सांगितले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी रुग्णालयात धाव घेऊन महेशच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.

जनावरे मोकाट सोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा

सिडको परिसरात काही मालक आपली जनावरे मोकाट सोडून देतात. दिवसभर ही जनावरे गल्ली-बोळात फिरत राहतात. जनावरे मोकाट सोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी.

-आ. सीमा हिरे