नाशिक : गोदावरी नदीची पूरस्थिती ओसरल्यानंतर चिखलमय, गाळयुक्त झालेल्या परिसराची स्वच्छता करण्याकडे पालिकेने मोर्चा वळविला आहे. गोदावरीवरील पूल, अमरधाम, नदी काठावरील रस्ते, रामकुंड परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. पुरामुळे सर्वत्र कचरा, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्याची सूचना पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

महापुरामुळे गोदा काठावरील झालेल्या नुकसानीची आयुक्त गमे यांनी पाहणी केली. दोन्ही तीरांवर सर्वत्र चिखल, कचऱ्याचे साम्राज्य असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्वच्छतेची कामे युद्धपातळीवर करून आवश्यक तिथे औषधफवारणी करण्याच्या सूचनाही गमे यांनी दिल्या.

गोदावरीच्या महापुराने रविवारी नाशिकला जोरदार तडाखा दिला. सोमवारी पातळी कमी झाली असली तरी पूरस्थिती कायम होती. मंगळवारी मात्र गोदापात्रातील पाणी बरेच कमी झाले. पाण्याखाली गेलेले छोटे-मोठे पूल वाहतुकीसाठी खुले झाले. परंतु पुरात वाहून आलेला कचरा, झाडांच्या फांद्या, तत्सम कचरा कठडय़ावर अडकून पडला. गाळामुळे पूल चिखलमय झाले. रामकुंडाच्या सभोवताली वेगळी स्थिती नाही. नदीकाठावरील अमरधाममध्ये पुराचे पाणी शिरल्याने हीच अवस्था होती. सर्वत्र गाळाचे साम्राज्य असल्याने अमरधामचा वापर करता येत नव्हता. महापुरात अनेक पुलांचे कठडे तुटले. विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. पात्रालगतचा गाळ काढणे, रस्त्यांवरील ढापे, फुटलेल्या चेंबरची दुरुस्ती आदींबाबत आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी तक्रारी, सूचनांचा पाऊस पाडला.

गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर मदतकार्याने खऱ्या अर्थाने वेग घेतला असून अग्निशमन दलाचे अधिकारी-कर्मचारी ३५ ते ४० मदतनीस घेऊन कामाला भिडले आहेत. प्रत्येक केंद्रावरील पाण्याचे बंब स्वच्छतेसाठी वापरण्यात आले असून नदीकाठावरील अमरधामच्या स्वच्छतेचे काम प्रथम हाती घेण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी एस. के. बैरागी यांनी दिली

महापुरामुळे गोदा काठावरील झालेल्या नुकसानीची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पाहणी केली. स्वच्छतेची कामे युध्दपातळीवर करून आवश्यक तिथे औषध फवारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले .