मुंबई : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका अवघ्या दहा ते बारा हजार रुपयांत मिळत असल्याची जाहिरात समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली. या कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलीस याबाबत अधिक चौकशी करीत आहेत.

‘बनावट गुणपत्रिकेचे प्रकरण हे समाजाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणारे आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारच्या बाबींना आळा बसण्यास मदत होईल’, अशी लेखी तक्रार मुंबई विद्यापीठ प्रशासनाने वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यांपासून विद्यार्थ्यांनी सावध रहावे, असे आवाहनही मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा : “न्यायालय टपाल खाते आहे का ?”, मतदान यंत्र खरेदीसंदर्भातील याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्याला खडेबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र घरबसल्या फक्त एका दिवसांत १० ते १२ हजार रुपयांत मिळवा, अशा आशयाची समाजमाध्यमावरील जाहिरात पाहून पुणे येथील एका व्यक्तीने त्या मजकुराखाली दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा गुणपत्रिका विकणाऱ्यांनी २ हजार रुपये आगाऊ रक्कम पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने २ हजार रुपये पाठविल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची ‘बी.एस्सी’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या सत्राची कथित बनावट गुणपत्रिका आली. ही घटना मुंबई विद्यापीठापर्यंत पोहोचली आणि हे प्रकरण काही व्यक्तींनीही मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु बनावट गुणपत्रिकेवर स्वाक्षरी मात्र जुन्या परीक्षा संचालकांची आहे. एप्रिल २०२३ मध्ये डॉ. प्रसाद कारंडे हे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक होते. मात्र मिळालेल्या गुणपत्रिकेवर माजी परीक्षा संचालक डॉ. विनोद पाटील यांची स्वाक्षरी दिसत असल्यामुळे ही गुणपत्रिका बनावट असल्याचे सिद्ध होते.