लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मुंबईतले काँग्रेसचे दोन नेते लोकसभेसाठी उत्सुक आहेत. उत्तर पश्चिम मुंबईची जागा ठाकरे गटाने अमोल किर्तीकरांना दिली. त्यानंतर मुंबईत काँग्रेसने दोन जागांवर दावा सांगितला आहे. अमोल किर्तीकरांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यानंतर संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकरांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर पक्षाने निरुपम यांना पक्षातून हाकललं. त्यानंतर काँग्रेस आता उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागांसाठी आग्रही आहे.
उत्तर मुंबईसाठी ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकरांना उमेदवारी मिळावी अशी मागणी होत होती. काँग्रेसच्या चिन्हावर घोसाळकरांनी लढावं अशी ऑफर त्यांना नाना पटोलेंनी दिल्याचंही वृत्त आलं होतं. मात्र घोसाळकर यांनी ही ऑफर नाकारली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाई जगताप यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आपण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहोत असं भाई जगताप म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी टीव्ही ९ ला प्रतिक्रिया दिली आहे. तसंच याच वेळी भाई जगताप यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आहे.
नेमकं भाई जगताप यांनी काय म्हटलं आहे?
“महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची बैठक होती. त्यामध्ये सगळेजण होते. कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर आहे कार्यकर्त्यांनी भाजपाचा खोटारडेपणा कसा आहे हे सांगायचा प्रयत्न केला. वर्षाताई आणि आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे की दक्षिण मध्यची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आली पाहिजे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे. ते आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत” असं भाई जगताप म्हणाले. तसंच मोदी की गॅरंटी हे स्लोगन आता चर्चेत आलं आहे मात्र हेच स्लोगन मोदींना डुबवणार आहे अशी टीकाही भाई जगताप यांनी केली.
हे पण वाचा- भाई जगताप आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्रीचं दर्शन, अधिवेशनातला व्हिडीओ व्हायरल
मी ४३ वर्षे काँग्रेस पक्षासाठी दिली आहेत
उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन्ही आमच्या जागा आहेत. पाचव्या सत्रात निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आणखी वेळ आहे. चार-पाच दिवसांत निकाल लागेल. मी त्या जागेसाठी आग्रही आहे. कारण मी वांद्रेमध्ये राहतो. इतर सहकाऱ्यांनीही ही सीट मागितली आहे. उत्तर मध्य जागेसाठी मी प्रचंड आग्रही आहे. माझी ४३ वर्षे काँग्रेस पक्षासाठी दिली आहेत. मी प्रयत्न करतो आहे मात्र दुसऱ्या कोणाला तिकिट मिळू नये असंही माझं म्हणणं नाही. असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. “दक्षिण मध्यची जागा देखील आम्ही मागण्याचा प्रयत्न केला. एकनाथराव गायकवाड स्वतः इथून खासदार होऊन आले होते. चर्चा झाली. निर्णय झाला. त्यानंतर आम्ही स्वतः सर्वजण आता कामाला लागलो”, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.