नाशिक : नाशिकच्या जागेवरून महायुतीत निर्माण झालेले त्रांगडे अखेर तीन आठवडयांनी दूर होण्याच्या मार्गावर असून हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी दिली जाईल की, नवा चेहरा म्हणून जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना रिंगणात उतरविण्यात येईल, याची उत्सुकता आहे.

महायुतीतील तीनही पक्षांच्या दावेदारीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नाशिक मतदारसंघ शिंदे गटाला राखता येईल की नाही, याबद्दल साशंकता होती. भाजपने नाशिक हा आपला बालेकिल्ला असल्याचा दावा केला होता. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केली होती. त्यातच भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केल्याने सर्व समीकरणे बदलली होती. प्रारंभी शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध करून नाशिकच्या जागेवर दावा करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा स्वर भुजबळांचे नाव आल्यानंतर बदलला.

हेही वाचा >>> “मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल

जागा राखण्यासाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे, मुंबई वाऱ्या करून शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. या घटनाक्रमात भुजबळ यांनी शुक्रवारी स्वत:हून माघार घेतल्याने स्पर्धेतील प्रबळ दावेदार बाजूला झाल्याचे शिंदे गटाकडून मानले जात आहे.

भुजबळांचे आभार

भुजबळ यांच्या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत होत आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारी मागे घेतल्याबद्दल जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी आभार मानले. शिंदे गटाचे खासदार व इच्छुक हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांत प्रचार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवा चेहरा?

भाजपमध्ये गोडसे यांच्याविषयी नाराजी होती. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही नाराजी दूर होईल, असे गोडसे यांनी नमूद केले.  मध्यंतरी गोडसे व भुजबळ यांच्या नावावरून मतभेद झाल्यानंतर महायुतीने स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. उमेदवार निश्चितीत या सर्वेक्षणाचा आधार घेतला जाईल की गोडसेंना पुन्हा उमेदवारी देण्यात येईल, याकडे शिंदे गटासह मित्रपक्षांचेही लक्ष लागून आहे.