News Flash

सरकारवाडय़ात शिवकालीन नाणी आणि शस्त्रांचा खजिना खुला

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नव्या पिढीला पौराणिक, ऐतिहासिक संदर्भाची माहिती व्हावी तसेच स्मृतींना उजाळा मिळावा यासाठी प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, भारतीय सांस्कृतिक निधी, नाशिक चार्टर आणि सराफ बाजार संघटनेच्या वतीने मंगळवारपासून ‘शिवकालीन नाणी अन् शस्त्र’ यांचे अनोखे प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले करण्यात आले आहे. या निमित्ताने सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गमे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात पाडण्यात आलेली दुर्मीळ होन नाणी, मराठा काळातील शस्त्र आणिा इतर पुरातन वस्तू, आभूषणे, विविध राजघराण्यातील चलनी नाणी यांची पाहणी केली. यावेळी सराफ संघटनेचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, भारतीय सांस्कृतिक निधीचे योगेश कासार, मराठाकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक अनंत ठाकूर, ज्येष्ठ नाणी संग्राहक पुरुषोत्तम भार्गवे आदी उपस्थित होते.

या संग्रहालयात प्रदर्शनीय कला वस्तूंमध्ये शस्त्रास्त्रे, पाषाणशिल्पे, धातूशिल्पे, नाणी, रंगचित्रे, छायाचित्रे आदी मांडण्यात आली आहेत. तसेच प्रादेशिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ शिल्पे, शस्त्रे, नाणी प्रदर्शनात ठेवण्यात आली असल्याचे प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितले.

राजापूरकर यांनी होन नाण्यांचा इतिहास मांडला. रायगडावर राज्याभिषेकाच्या निमित्ताने सुवर्ण होन टांकसाळीतून पाडण्यात आले. त्या होनांचा वापर शिवाजी

महाराज, मातोश्री जिजाबाई आणि सोनोपंत डबीर यांच्या सुवर्णतुलेसाठी झाला. नंतर त्याचे दान करण्यात आले. यानंतर मराठा राज्यात ठिकठिकाणी होन काढण्यात आले.

मराठय़ांची सुवर्ण नाणी काढण्याची उदासीनता यामुळे होन फार कमी काढले गेले. भारतीयांची सोन्याची आवड आणि भक्तीमुळे सुवर्ण होनचे दागिने करण्यात आले. अगदी बोटावर मोजण्याइतके शिवकालीन होन अस्तित्वात आहेत.

सध्या सराफ बाजार अतिक्रमणमुक्त झाल्याने इतिहासप्रेमी नाशिककरांनी नाशिकचा वारसा असलेला सरकारवाडा आणि प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन राजापूरकर यांनी केले आहे.

दरम्यान, सप्ताहात गुरुवारी सरकारवाडय़ात सायंकाळी सहा वाजता ‘नाणेशाळा’ विषयावर चेतन राजापूरकर यांचे व्याख्यान होईल.

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ‘नाशिक शहराचा इतिहास आणि वारसा’ या विषयावर रमेश पडवळ यांचे व्याख्यान, शनिवारी सकाळी साडेसहा ते ११ या वेळेत ‘हेरिटेज वॉक’ तसेच सायंकाळी चार वाजता वैराज कलादालन येथे ‘वास्तू संवर्धन एक दृष्टिक्षेप’ या विषयावर विकास दिलावर यांचे व्याख्यान, रविवारी चित्रकला स्पर्धा, पराग मंडाले यांचे ‘महात्मा गांधी’ या विषयावर व्याख्यान आणि दुपारी तीन वाजता ‘पेशवेकालीन आभूषणे’ यावर जान्हवी राजापूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 2:54 am

Web Title: coins of shivaji era and weapons open for public exhibition zws 70
Next Stories
1 महात्मा फुले आरोग्य योजनेविषयीची चालढकल चिमुकलीच्या जिवावर
2 सहलीविषयी आघाडीत एकवाक्यतेचा अभाव
3 भाजपपुढे सत्ता राखण्याचे आव्हान
Just Now!
X