23 July 2019

News Flash

संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करणार

निवडणूक खर्चाबाबत संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीतील माहिती 

लोकसभा निवडणुकीसाठीची कामे योग्य रीतीने आणि कालमर्यादेत होण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करीत जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या निवडणूक समन्वय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक खर्चाबाबत संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

बैठकीस अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नितीन राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी उपस्थित होते. निवडणूक प्रशिक्षणाची पूर्ण माहिती घेऊन त्याचे नियोजन करावे. आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या पालनाबाबत विशेष लक्ष देऊन दररोज अहवाल सादर करावा, असे सूचित करण्यात आले.

नामांकन भरतांना तीन वाहनापेक्षा अधिक वाहने आणता येणार नाही. अशा वेळी वाहने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर उभी करावी लागतील. ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटबाबत नियुक्त समितीने विशेष दक्षता घ्यावी. विहित पद्धतीने यंत्रांची तपासणी करावी, असे सूचित करण्यात आले.

सागर यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारासाठी ७० लाखांची खर्चमर्यादा आहे. समितीने उमेदवाराच्या निवडणूक खर्चाची योग्य रीतीने तपासणी करावी. खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करावी. उमेदवाराने दाखविलेल्या खर्चाबाबत शंका असल्यास त्याचे तातडीने स्पष्टीकरण मागवावे असे त्यांनी सांगितले.

आनंदकर यांनी पोलीस, प्रादेशिक परीवहन अधिकारी, उत्पादन शुल्क आणि महसूल विभागाने खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती तातडीने द्यावीत. भित्तिपत्रकाची परवानगी घेतली नसल्यास गुन्हे दाखल करावे. मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवर बँक अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, उमेदवारासाठी निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. खेडकर यांनी शासकीय किंवा अधिकारातील जागेत प्रचार करता येणार नाही. असे आढळल्यास गुन्हे दाखल करावे, असे सांगितले.

निवडणूक खर्चावर विशेष लक्ष

कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक शाखेकडे द्यावी. या निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून खर्च निरीक्षक स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात येणार आहे. निवडणूक खर्चावर विशेष लक्ष द्यावे. अधिकृत दराबाबत राजकीय पक्षांना माहिती देण्यात येणार असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल, असे राधाकृष्णन बी म्हणाले

First Published on March 7, 2019 12:56 am

Web Title: collection of sensitive polling stations in nashik