राज्यात सत्ता स्थापनेवरून वेगवान घडामोडी घडत असताना दुसरीकडे याच वेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी गांधी कुटुंबीयांचे विशेष संरक्षण कवच काढल्यावरून भाजप विरोधात मैदानात उतरले. शहर काँग्रेस कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोमवारी सकाळी पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून गांधी कुटुंबीयांना विशेष संरक्षण पथकाचे (एसपीजी) कवच तातडीने देण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना विशेष संरक्षण पथकाची सुरक्षा दिली होती. परंतु, मोदी सरकारने गांधी कुटुंबीयांच्या बलिदानाची, त्यांना असणाऱ्या संभाव्य धोक्याची दखल न घेता कुटुंबीयांना असलेली विशेष सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या नेत्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून दहशतवादी आणि देशविघातक कृत्य करणाऱ्यांना मोकळीक देण्यासारखे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

काँग्रेसच्या नेत्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रांकडून काँग्रेसच्या नेत्यांना संपविण्याचे डाव आखले जातात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या देशविघातक तत्त्वांनी केल्या. अशा स्थितीत मोदी सरकारने सुरक्षा कवच काढून घेणे योग्य नाही, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.

भाजपने संकुचित राजकारण न करता, द्वेषभावना सोडून जनहिताचा निर्णय घेऊन काँग्रेस नेत्यांना विशेष सुरक्षा कवच तातडीने द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केली. आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर आणि अन्य सहभागी झाले होते.