दोन्ही नगरसेवकांसह चार संशयितांना अटक

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो चौफुलीलगत अपघाताचे निमित्त झाले आणि कार्यकर्त्यांसह जमलेल्या शिवसेना, भाजप नगरसेवकांनी घटनास्थळी चौकशीसाठी आलेल्या अंबड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत  शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे आणि भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांच्यासह अन्य दोन जणांना अटक केली आहे.

रविवारी मध्यरात्री एक्स्लो चौफुलीलगत ही घटना घडली. या चौफुलीजवळ तीन वाहनांचा अपघात झाला. त्यातील एक मोटार नगरसेवक भागवत आरोटे याच्या भावाची होती. संबंधिताने दूरध्वनी करून कार्यकर्त्यांना घटनास्थळी बोलावले. अपघातामुळे परिसरात गर्दी झाली होती. दरम्यानच्या काळात नगरसेवक आरोटे आणि दोंदेही तिथे पोहचले. याबाबतची माहिती समजल्यानंतर बीट मार्शल विष्णू गावित हे गृहरक्षक दलाच्या जवानासोबत आले. गर्दी हटविण्यास त्यांनी सुरूवात केली. यावेळी नगरसेवक, कार्यकर्त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काहींनी गळा दाबून गावितांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर अंबड  ठाण्यातील पोलिसांनी धाव घेतली. तोपर्यंत संशयित घटनास्थळावरून पसार झाले होते.

पोलीस कर्मचारी गावित यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांवर प्राणघातक हल्ला, शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सेनेचे नगरसेवक आरोटे, भाजपचे दोंदे, अमित आरोटे, अजय मिश्रा यांच्यासह अन्य संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांसह अमित आरोटे आणि मिश्राला अटक केली आहे. या घटनेतील एक संशयित राहूल आरोटे हा फरार आहे. सेनेचे आरोटे हे प्रभाग २६, तर भाजपचे दोंदे हे प्रभाग २७ चे नगरसेवक आहेत. सेना नगरसेवकाच्या भावाच्या वाहनास अपघात झाल्यावर दोंदे मदतीला धावल्याचे सांगितले जाते. आरोटे यांचा जो भाऊ सध्या फरार आहे, त्याने महापालिकेत एकदा पिस्तूल दाखविल्याचा इतिहास आहे.

करोना विरोधातील लढाईत पोलीस यंत्रणा आघाडीवर

आहे. टाळेबंदीतील नियमांच्या अमलबजावणीची धुरा यंत्रणेवर आहे. पोलिसांच्या कामगिरीचे सामान्यांकडून पुष्पवृष्टीचा वर्षांव करून कौतुक होत आहे. याचवेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याने संतप्त भावना उमटत आहेत.