अन्न-औषध प्रशासनाची रुग्णालये, पुरवठादारांना सूचना; दरवाढ रोखण्याचाही प्रयत्न

नाशिक : करोनाबाधितांमध्ये दिवसागणिक कमालीची वाढ होत असताना या काळात द्रवरूप प्राणवायूचा तुटवडा भासू नये म्हणून सर्व करोना रुग्णालयांनी पुरवठाधारकाशी प्राणवायूचे प्रमाण व दर यासंबंधी करारनामा करावा, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाने केली आहे. अशा करारनाम्यामुळे पुरवठादारावर प्राणवायू पुरविणे बंधनकारक राहील. सध्या जिल्ह्यत प्राणवायूचा तुटवडा नाही.

मध्यंतरी काही पुरवठादार शासकीय रुग्णालयांना कमी आणि खासगी रुग्णालयांना पुरेपूर द्रवरूप पाणीपुरवठा करीत होते. या कार्यपद्धतीने शासकीय रुग्णालये वेठीस धरली गेली होती. आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रयोजनासाठी ८० टक्के आणि औद्योगिक प्रयोजनार्थ २० टक्के प्राणवायूचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात मागणीत वाढ होऊ शकते.  मागणी-पुरवठय़ात तफावत होऊन तुटवडा भासू नये म्हणून अन्न औषध प्रशासनाने करोना रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये आणि प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्यांना करारनामा करण्याचे सूचित केले आहे.

या संदर्भात प्राणवायू पुरवठादारांची बैठकही घेण्यात आली. द्रवरूप प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात उत्पादन होणे आवश्यक आहे. ज्या रुग्णालयांना पुरवठादार सिलिंडर पुरवितो त्यांच्याशी करारनामा करावा. मागणीनुसार पुरवठा करणे आणि दर आदी बाबी दोघांवर बंधनकारक राहतील. प्राणवायूच्या पुरवठय़ासाठी आवश्यक त्या साधनसामग्रीची तजवीज करावी, असे संबंधितांना सांगण्यात आले आहे.

करोना रुग्णालयांनी खाटा आणि अतिदक्षता विभागातील खाटांच्या संख्येच्या प्रमाणात आवश्यक तो दैनंदिन प्राणवायू सिलिंडरचा पुरवठा निश्चित करावा. ज्या परवानाधारक पुरवठादारामार्फत सध्या पुरवठा होतो, त्याच्याशी प्राणवायूचे प्रमाण आणि दर याबाबत करारनामा करावा. रुग्णालयात सिलिंडरमधून गळती होणार नाही याची तपासणी करावी. रुग्णालयास पुरविलेले सिलिंडर काळ्या रंगाचे तथा औद्योगिक वापराचे नाहीत याची खात्री करणे गरजेचे आहे. तसे काही आढळल्यास रुग्णालयांनी ८७८०१ ८६८६२, ९८५०१ ७७८५३ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. पुरवठादार काही अपरिहार्य कारणास्तव सिलिंडर पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्यास रुग्णालये इतर पुरवठादाराशी करारनाम्याचा विचार करू शकतात, याकडे अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी लक्ष वेधले आहे.

प्राणवायूची सद्य:स्थिती

जिल्ह्यची सध्या प्राणवायूची गरज २५.५७ मेट्रिक टन इतकी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालये जवळपास ८२ मेट्रिक टनपर्यंत सिलिंडर घेत आहेत. तरीदेखील ३५.३ मेट्रिक टन प्राणवायू शिल्लक राहतो. प्राणवायूच्या नवीन पुनर्भरण केंद्राला मान्यता देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयांसाठी लागणाऱ्या प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. त्यांची एकूण ११८.८३ मेट्रिक टनची क्षमता आहे. याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी दिली. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यत सध्या अतिदक्षता कक्षातील ४९३ आणि या कक्षाच्या बाहेरील ७६८ रुग्णांना प्राणवायूची गरज भासते.