हॉटेल कामगारांकडून एकास मारहाण

हॉटेलमधील ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची वारंवार तक्रार करतो, असे सांगत तीन कामगारांनी एकाला शिवाजीनगरमध्ये बेदम मारहाण केली. याबाबत रवींद्र पाटील यांनी तक्रार दिली. पाटील हे दुचाकीवर घरी जात असताना ही घटना घडली. पाझर तलाव परिसरातील गतिरोधकावर त्यांची दुचाकी बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना घराशेजारील ग्लोबल हॉटेलमधील तीन कामगार तेथे आले. त्यांनी तू नेहमी आमच्या हॉटेलमधील आवाजाची पोलिसांत तक्रार करतोस काय, असे म्हणून शिवीगाळ केली. या घटनेत पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस स्थानकात महिलेचे दागिने लंपास

बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पाकीट चोरून नेल्याची घटना ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात घडली. पाकिटात दागिन्यांसह भ्रमणध्वनी असा सुमारे ९१ हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबत प्रियंका पाटील (पुणे) यांनी तक्रार दिली. पाटील कुटुंबासह शहरात आल्या होत्या. अमळनेर येथे जाण्यासाठी त्या चोपडा बसमध्ये चढत असताना चोरटय़ांनी गर्दीची संधी साधून त्यांच्या पर्समधील पाकीट लंपास केले. पाकिटात सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे कडे, भ्रमणध्वनी, महत्त्वाची कागदपत्रे आदी होते. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उघडय़ा घरात चोरी

कुटुंबीय कामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरटय़ांनी उघडय़ा घरात प्रवेश करीत ३० हजारांचा ऐवज चोरला. वासननगर परिसरात ही घटना घडली.

या संदर्भात महालक्ष्मी रो हाऊस येथे वास्तव्यास असणाऱ्या सोमनाथ सोमासे यांनी तक्रार दिली. सकाळच्या सुमारास सोमासे कुटुंबीय घरात कामात व्यस्त होते. चोरटय़ांनी घरात प्रवेश करून दोन भ्रमणध्वनी, पेनड्राइव्ह, डेटा कार्ड आणि पाकीट असा सुमारे २९ हजारांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.