कामकाज पूर्ण क्षमतेने

नाशिक : करोनाचा आलेख दिवसागणिक उंचावत असतांना सरकारी आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असली तरी येथील टपाल कार्यालयांमध्ये सद्यस्थितीतही पूर्ण क्षमतेने काम सुरू आहे. लोकांची समजूत घालूनही टपाल कार्यालयात येणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंध लागू के ले असले तरी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी आस्थापनांमध्ये ५० टक्के क्षमतेवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्यावश्यक सेवेत अंतर्गत टपाल सेवेचा अंतर्भाव करण्यात आला आहे. परंतु, आजही टपाल विभाग पूर्ण क्षमतेने काम करत आहे. शहर परिसरात दोन मुख्य कार्यालयांसह ५० हून अधिक उपकार्यालये आहेत. ग्रामीण मध्ये २० मुख्य तसेच लहान २५८ कार्यालये आहेत. कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ऑनलाइन व्यवहाराला चालना मिळण्यासाठी टपाल विभागाने पोस्ट इन्फो अ‍ॅप सुरू केले. या माध्यमातून ग्राहकांनी आम्हाला सेवा हवी असा संदेश टाकला तर त्यांना पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच सेवा मिळेल. याशिवाय पोस्ट पेमेंट बँकचाही पर्याय खुला असताना ग्राहकांकडून प्रत्यक्ष सेवेचा आग्रह धरला जात आहे. गर्दीमुळे टपाल कार्यालयातही करोनाचा शिरकाव झाला आहे.

काही अधिकारी, कर्मचारी बाधित झाले आहेत. अशा स्थितीतही वरिष्ठ पातळीवरून मेळावे घ्या, तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुविधा ग्राहकांपर्यंत पोहचवावी, असे लक्ष्य दिले जात आहे.

ज्येष्ठांना कोण समजविणार ?

टपाल कार्यालयात ज्येष्ठांची गर्दी मोठय़ा प्रमाणावर होत आहे.  टपाल खात्याचे पुस्तक अद्यावत करणे, आपल्या गुंतवणुकीवरील व्याज घेण्यासाठी ही मंडळी गर्दी करत आहेत. काही तर केवळ खात्यावर किती पैसे शिल्लक आहेत, एखाद्या वर्षांची नोंद लक्षात येत नसल्याने त्याचा तपशील द्या, असे सांगत वाद घालत आहेत.  काही ज्येष्ठ मंडळी वेगवेगळ्या कारणांनी गर्दी करत कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहेत. काहींना नवीन खाते उघडायचे असते. पोस्ट इन्फो या तंत्राची माहिती नसल्याचे कारण देत गर्दी वाढविण्यास ही मंडळी हातभार लावत आहेत.

 

बहुतांश लोकांना पैशांची गरज आहे. आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना सहकार्य करणे आमचे काम आहे. टपाल विभागातून सातत्याने अत्यावश्यक कामाची सूचना करण्यात येत आहे.

संदीप पाटील  (प्रभारी अधिकारी)