पूर्वार्धात गतवर्षीपेक्षा साडेआठ हजार मिलीमीटर कमी पाऊस; पाणीकपातीबाबत आज निर्णयाची शक्यता

नाशिक : प्रदीर्घ काळापासून दडी मारणाऱ्या पावसाची रिपरिप गुरुवारी काहीअंशी संततधारेत रूपांतरित झाली. दुपारी अचानक त्याने जोर पकडल्याने नाशिककरांना हायसे वाटले. हंगामाच्या पूर्वार्धाचा विचार करता सरासरीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ८६१७ मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी धरणांमध्ये जेमतेम ५१ टक्के जलसाठा आहे. पुढील काळात टंचाईला तोंड द्यावे लागू नये म्हणून शहरात पाणीकपातीचा विचार सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

गेल्या वर्षी पावसाचा हंगाम जिल्ह्य़ासाठी तुफान पावसाचा ठरला होता. १ जून ते १३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत १७८०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा हे चित्र पूर्णत: बदलले आहे. या वर्षी उपरोक्त काळात ९१९० मिलीमीटर पावसाची नोंद आहे. काही अपवाद वगळता दोन महिन्यात सलग काही दिवस मुसळधार पाऊस झालेला नाही. अधूनमधून त्याने काही भागात हजेरी लावली. परंतु, संपूर्ण जिल्हा व्यापल्याचे दिसले नाही.

इगतपुरी तालुक्यात २१२०, पेठ ७४७, त्र्यंबकेश्वर ७६७, सुरगाणा ७०३, मालेगाव ५६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. उर्वरित नाशिक ४२८, दिंडोरी ३५१, नांदगाव ४९०, चांदवड ३३७, कळवण ३३८, बागलाण ५९४, देवळा ३७४, निफाड ३३८, सिन्नर ५६७, येवला ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. दोन्ही वर्षांतील आकडेवारीची तुलना केल्यास यंदा इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.

शहरावर पाणीकपातीचे संकट

हंगामाचा पूर्वार्ध उलटून गेल्यानंतरही गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरण समूहात सध्या केवळ ४५ टक्के अर्थात ४५९९ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ३३८९ दशलक्ष घनफुट जलसाठा आहे. उत्तरार्धात अपेक्षित पाऊस न झाल्यास शहराला भविष्यात गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते. पाटबंधारे विभागाने याबाबत महापालिकेला पाण्याचे नियोजन करण्याचे सूचित केले आहे. पालिका प्रशासनाने शहरात एकवेळ पाणीपुरवठय़ाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. धरणात १३२ दिवस पुरेल इतकाच जलसाठा आहे. शहरात काही भागात दोन वेळा तर काही भागात एकवेळ पाणीपुरवठा केला जातो. ज्या भागात दोनवेळा पाणीपुरवठा होतो, तिथे एक वेळ आणि जिथे एक वेळ होतो तिथे १५ ते २० मिनिटे कपात करण्यास सुचविण्यात आले आहे.

जलसाठय़ात ३४ टक्के घट

पावसाने दडी मारल्याचा परिणाम धरणांच्या जलसाठय़ावरही झाला आहे. सध्या जिल्ह्य़ातील लहान,मोठय़ा २४ धरणांमध्ये ३३ हजार ६८४ दशलक्ष घनफूट अर्थात ५१ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हे प्रमाण ५६ हजार ६४ दशलक्ष घनफूट अर्थात ८५ टक्के होते. गंगापूर धरण समूहात सध्या ४५९९ (४५ टक्के), पालखेड ३३१ (५१), करंजवण १२९५ (२४), वाघाड ४६६ (२०), ओझरखेड ८७३ (४१),

पुणेगाव ८४ (१३), तिसगाव ४७ (१०), दारणा ६५८७ (९२), भावली १४३४ (१००), मुकणे ३३३१ (४६), वालदेवी (४९), कडवा ८६० (५१), नांदूरमध्यमेश्वर २५७ (१००), भोजापूर २०६ (५७), चणकापूर ८४१ (३५), हरणबारी ११६६ (१००), केळझर २२९ (४०), नागासाक्या २७९ (७०), गिरणा ९२४९ (५०), माणिकपुंज ३३४ (१००) जलसाठा आहे.