‘एटीएम’मधून शंभर व पाचशेच्या नोटांची प्रतीक्षा; उद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण

नोटांबंदीला आता एक महिना झाला तरी अनेक समस्या कायम आहेत. शहरातील बहुतांश एटीएम बंद अवस्थेत आहेत. एटीएममधून शंभर व पाचशेच्या नोटांच्या प्रतीक्षेत नागरिक असून या नोटांच्या तुटवडय़ामुळे उद्योजकांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत सुटय़ा पशांसाठी नागरिकांची भटकंती सुरूच आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बॅँकेकडून इतर बँकांना पाचशे व शंभरच्या नोटांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत होत नसल्याने आजही बाजारात नोटाबंदीचा परिणाम जाणवत आहे. उद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काळा पसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा होताच नागरिकांची  तारांबळ उडाली. जुन्या नोटा बँकेत बदलवून नव्या घेण्याकरिता सर्व बँकांसमोर नागरिकांच्या मोठय़ा रांगा दिसून आल्या. नोटाबंदीमुळे एटीएम रिकामे झाले. अशात नागरिकांना बँकेतून मर्यादित नोटा मिळत असल्याने सर्वानीच बँकेकडे धाव घेतली. शहरातील उद्योग धंदे ठप्प पडले. हे सर्व चित्र लवकरच सुरळीत होईल असा दावा सरकारने केला, मात्र नोटबंदीला तब्बल महिना झाला असून पाचशे व शंभरच्या नोटांचा तुटवडा कायम आहे. बाजारात हव्या त्या प्रमाणात पाचशे व शंभरच्या नोटा नसल्याने तसेच एटीएममधून देखील केवळ २ हजाराचीच नोट मिळत असल्याने सुटय़ा पशांसाठी आजही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चलनात सर्वात जास्त उपयोगी पडत असलेली पाचशे व शंभरच्या नोटा एटीएममधून कधी मिळणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. बँकेत आठवडय़ाला एकदाच २४ हजार रुपये मिळत असल्याने अनेकांच्या बँकेतील फेऱ्या वाढल्या आहेत. तसेच एटीएममधून पूर्वी प्रमाणे मोठी रक्कम काढता येईल का? असा सवाल नागरिक करीत आहेत.