मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारात अतिरेकी शिरल्याचा निनावी दूरध्वनी आल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाली. जिल्हा परिषदेचा ताबा घेत तेथे शिरलेल्या अतिरेक्यावर गोळीबार करण्यात आला. या सर्व घटनाक्रमामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली. परंतु नंतर हा सर्व प्रकार आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रात्यक्षिकाचा भाग होता, असे समजल्यावर त्यांना दिलासा मिळाला.

सण उत्सवाच्या काळात यंत्रणा कितपत सतर्क आहे याची चाचपणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात मंगळवारी सकाळी हे प्रात्यक्षिक करण्यात आले. साडेअकरा वाजता अग्निशमन विभागाचा दूरध्वनी खणाणला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात अतिरेकी शिरल्याचे सांगत तातडीने अग्निशमन बंब पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार एक बंब आणि रेस्क्यु वाहन तातडीने जिल्हा परिषदेच्या आवारात पोहचले. त्यावेळी पोलीस, बॉम्ब शोध पथक आणि अन्य सुरक्षाविषयक यंत्रणेने  इमारतीचा ताबा घेत अतिरेक्यावर गोळीबार केला. इमारत परिसरात लपवून ठेवलेले बॉम्बही बॉम्ब शोधक पथकाने निकामी केले.

पोलिसांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, याविषयी सूचना केल्या. पोलीस आणि अन्य यंत्रणाच्या मदतीने सुरू असलेल्या प्रात्यक्षिकासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात अग्निशमन विभाग, महापालिका आरोग्य विभागाचे पथक, रुग्णवाहिका, पोलिसांची वेगवेगळी पथके यांची गर्दी झाली होती.  नेमके काय घडले हे पाहण्यासाठी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी गर्दी केल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.