मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त बंद करण्यात आलेल्या रस्त्यांची पूर्वकल्पना नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील काही शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला.

महाजनादेश यात्रेचे बुधवारी पाथर्डी फाटा येथे आगमन झाल्यावर दुचाकी फेरीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. पूर्वनियोजित वेळेपेक्षा यात्रा विलंबाने शहरात दाखल झाल्याने त्यादृष्टीने केलेल्या नियोजनावरही परिणाम झाला. यात्रेनिमित्त काढण्यात येणारी दुचाकी फेरी ही पाथर्डी फाटामार्गे अंबड लिंक रोड-उत्तम नगर रोड-उत्तम नगर चौक- पवननगर-सावतानगर-दिव्या अ‍ॅडलॅब-संभाजी चौक-दक्षिण हनुमान मंदिर-तरणतलावमार्गे ठक्कर बाजाराजवळ आली. या फेरीतील वाहनांची संख्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या  सुरक्षेच्या दृष्टीने हे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. याचा परिणाम शाळा, महाविद्यालयांवर झाला.  पवननगर येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी. पवार यांनी महाजनादेश यात्रेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी

पालकांना पूर्वकल्पना दिली होती, असे सांगितले. खासगी वाहनांनी येणाऱ्या  विद्यार्थ्यांनी स्वतच्या जबाबदारीवर शाळेत यावे, व्हॅन या परिसरात येणार नसल्याची कल्पना दिल्याने नेहमीपेक्षा अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहिले. शिक्षणाधिकाऱ्यांकडून सूचना न आल्याने शाळा नियमित वेळेत भरण्याचे आणि सोडण्याचे नियोजन होते.

सिडको कनिष्ठ महाविद्यालय वेळेआधी एक तास सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु यात्रेस विलंब होणार असल्याची माहिती मिळाल्यावर महाविद्यालय नियमित वेळेतच सोडण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालय सायंकाळी सुटत असल्याने त्याबाबत काही अडचण आली नसल्याचे प्राचार्य सोनसाखळकर यांनी सांगितले. फेरी मार्गावरील नाशिक एज्युकेशन संस्थेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.