‘शालेय व्यवस्थापन पदविका न घेतलेले सेवानिवृत्त आर्थिक कोंडीत

नाशिक : मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांच्या गुणात्मक वाढीसाठी शासनाने १५ वर्षांपूर्वी ‘शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम’ अभ्यासक्रम अनिवार्य केला. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, उपमुख्यापकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. संबंधितांना सेवानिवृत्ती लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून शिक्षक, मुख्याध्यापक यांनी गुणवत्तापूर्ण काम करावे यासाठी तसेच कामात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत तसेच इच्छुकांसाठी ‘शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम’ अभ्यासक्रम बंधनकारक केला.

शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच शिक्षणाचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठी तसेच मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांना त्यांची जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता यावी यासाठी या एक वर्षांच्या अभ्यासक्रमाची आखणी २००४-२००५ मध्ये झाली. त्या दृष्टीने शासकीय आदेशही झाले. १५ वर्षांत राज्यातून किती शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नाशिक जिल्ह्य़ात साधारणत: ७५० सरकारी, खासगी, प्राथमिक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. त्यापैकी

केवळ २० टक्के  म्हणजे १५०हून अधिक मुख्याध्यापकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी शासकीय निर्णयाचा आधार घेत मुख्याध्यापकांना हा अभ्यासक्रम बंधनकारक केला.

परिणामी ज्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, अशा सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सेवानिवृत्तीची प्रकरणे वरिष्ठ स्तरावर अडविली जात असल्याने सेवानिवृत्तीस आलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आर्थिक कोंडीत अडकले आहेत.

वास्तविक मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावर येणारी व्यक्ती ही ज्येष्ठ असते. कार्यानुभवातून कामाच्या पध्दतीत बदल होत राहतात. विद्यार्थ्यांच्या समस्या या वेगवेगळ्या पध्दतीच्या असतात. अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष काम यात तफावत असल्याने मुख्याध्यापकांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली.

अडवणूक करण्यासाठी सक्ती

सरकारचा निर्णय २००५ मध्ये आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली की नाही याचा पाठपुरावा झाला नाही. जिल्ह्य़ातील १५० मुख्याध्यापकांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्यक्ष काम आणि अभ्यासक्रम यांचा मेळ बसत नसल्याने अनेक मुख्याध्यापकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्ती प्रकरण अडविण्यात आले. आता जिल्ह्य़ातील काही मुख्याध्यापकांचे निवृत्तीस दोन-तीन महिने राहिले. अशा स्थितीत या शासकीय निर्णयाची सक्ती करणे ही एक प्रकारची अडवणूक आहे. संबंधित किंवा अन्य मुख्याध्यापक अभ्यासक्रम पूर्ण करणार कधी, त्याचा प्रत्यक्ष उपयोग काय, याचा विचार व्हावा.

– गुलाबराव भामरे (अध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ)

 

शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाची वैशिष्टय़े

अध्ययनार्थ्यांना व्यवस्थापनातील मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे, आधुनिक शैक्षणिक व्यवस्थापन विचारप्रवाहांची ओळख करून देणे, परिणामकारक व्यवस्थापनासाठी आवश्यक ज्ञान, अभिवृत्ती, कौशल्ये विकसित करणे, शैक्षणिक नवोक्रम आणि प्रयोगासाठी प्रवृत्त करणे, दैनंदिन अडचणींकडे पाहण्याचा संशोधकाचा दृष्टिकोन विकसित करणे, शिक्षणातील गुणवत्ता व्यवस्थापनेच्या संकल्पनेचा परिचय करून देणे