देशभरात टाळेबंदी लागू झाल्यानंतर किराणा दुकानांमधील वस्तुंच्या किंमती अचानक वाढल्याची अनुभुती ग्राहक घेत आहेत. जीवनावश्यक वस्तुंसह या यादीत समाविष्ट नसलेल्या सामग्रीची अधिक दराने विक्री होत आहे. घाऊक वितरक जादा दराने माल देत असल्याच्या तक्रारी किरकोळ व्यापाऱ्यांनी केल्यानंतर भरारी पथकाने संबंधिताच्या व्यवहारांवर नजर ठेवली. तेव्हा जुन्या दराने वस्तू मिळू लागल्या. शहर वा जिल्ह्य़ात छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीला अन्न-धान्य वा किराणा सामग्रीची विक्री केल्यास कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर किराणा साहित्य, भाजीपाला, फळे आदी दैनंदिन गरजेच्या वस्तू जादा किंमतीला ग्राहकांना खरेदी कराव्या लागत आहे. गहू, तांदूळ, डाळी, खाद्य तेल अशा बहुतांश वस्तुंचे दर दोन ते दहा रुपयांनी वाढल्याच्या तक्रारी आहेत. पुरवठा विभागाकडे दिवसभरात अशा अनेक तक्रारी येत आहेत. घाऊक वितरक जादा किंमतीला माल देतात. यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे किरकोळ व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर पुरवठा विभागाने किराणा दुकानांना अन्न धान्याचा पुरवठा करणाऱ्या घाऊक वितरकावर लक्ष केंद्रीत केले.

पेठ रस्त्यावरील शरद पवार मार्केट यार्डमधील वितरकाच्या दुकानात भरारी पथकाने ठाण मांडले. दिवसभरातील व्यवहारांवर लक्ष देऊन किरकोळ व्यापाऱ्यांकडून माहिती घेतली. जादा किंमतीला अन्न धान्याची विक्री झाल्यास कारवाईचा इशारा दिल्यामुळे घाऊक वितरकाला जुन्या दराने मालाची विक्री करावी लागली. या बाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नर्सीकर यांनी दिली. शहरात घाऊक-किरकोळ व्यापाऱ्यांनी अन्न धान्य वा अन्य खाद्य पदार्थ छापील किंमतीपेक्षा अधिक किंमतीने विकल्यास ग्राहकांनी पावती घ्यावी. संबंधित व्यापाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.