जिल्हा शल्य चिकित्सकांचा आदेश

जिल्ह्य़ातील विशेषत : आदिवासीबहुल भागात आरोग्य सेवा देण्यात आरोग्य विभाग कमी पडत आहे. बहुतांश ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारींमुळे  जिल्हा शल्य चिकित्सकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याचा आदेश दिला आहे.

आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरीच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यक सेवा सुविधा अंतर्गत त्या भागात निवास व्यवस्था करून देण्यात आली आहे. असे असतानाही वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी कामाच्या ठिकाणी न राहता गावाच्या ठिकाणी किंवा शहर परिसरात राहत आहेत.

काही ठिकाणी अधिकारी तसेच कर्मचारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालयाबाहेर असतात. अशा स्थितीत आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास गरजू रुग्णांना ग्रामीण किंवा जिल्हा रुग्णालय गाठावे लागते. परिणामी जिल्हा शासकीय रुग्णालयावरील भार वाढत आहे. या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमाच्या प्रभावी अमलबजावणीकरिता १७ जुलै रोजी जिल्ह्य़ातील ३८ सरकारी रुग्णालयांकडून संबंधित माहिती मागविण्यात आली.

माहिती संकलनासाठी ३१ जुलैची अंतिम मुदत देण्यात आली होती. यादरम्यान  तृतीय तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संप, जिल्हा शल्य चिकित्सकांवर नाशिक विभागाचे आरोग्य संचालक म्हणून असणारी जबाबदारी आदी कारणांमुळे आदेश प्राप्त होऊन महिना झाला असला तरी अद्याप माहिती संकलित होऊ शकलेली नाही. काही रुग्णालयांकडून वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याचा दावा करणारे पत्र आणि कागदपत्रे प्राप्त झाली आहेत. त्यासंदर्भातही चौकशी होणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.

माहिती संकलनाचे काम सुरू.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अखत्यारीत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांकडून माहिती संकलनाचे काम अद्याप सुरू आहे. ही माहिती प्राप्त झाल्यावर त्या अनुषंगाने त्याचे वर्गीकरण होईल. कोणी दोषी आढळल्यास त्याचा वेतनभत्ता तसेच पगारवाढ थांबविण्यात येईल.

-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा शल्य चिकित्सक