युवतीवर बलात्कार व बळजबरीने गर्भपात केल्याप्रकरणी नगरसेवकपुत्र अजिंक्य चुंबळेवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या गर्भपात प्रकरणात आता डॉ. उमेश मराठे याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करीत इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली. संशयित डॉक्टर हा शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांचा भाऊ आहे. न्यायालयाने संशयितास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

[jwplayer 8cIf7m5X]

माजी स्थायी सभापती शिवाजी चुंबळे यांचा मुलगा अजिंक्य याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून अजिंक्यने वेळोवेळी शारीरिक अत्याचार केले आणि दिवस राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केल्याची तक्रार एका युवतीने दिली होती. या प्रकरणी अजिंक्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली असता या प्रकरणी डॉ. उमेश मराठे यांच्यावर संशय आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये डॉ. मराठे वैद्यकीय सेवा देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी डॉ. मराठेला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने डॉ. मराठेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपासात दवाखान्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाची काय भूमिका राहिली, या दृष्टीने चौकशी होणार आहे. या दोन्ही गुन्ह्यांत राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक संशयित आहेत. संशयित अजिंक्य चुंबळेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पालिका निवडणुकीस मैदानात उतरण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. अत्याचार प्रकरणातील संशयित अजिंक्यचे २५ नोव्हेंबरला लग्न आहे. न्यायालयाने २३ नोव्हेंबपर्यंत त्याला हंगामी जामीन दिला आहे.

[jwplayer izOWW4O7]