स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या महापालिका सभागृहात शुक्रवारी समस्त नगरसेवकांना दिव्याखाली अंधाराची अनुभूती घ्यावी लागली. वीजपुरवठा आणि जनरेटरची व्यवस्था बंद पडल्याने सदस्यांना सभागृहात कागदी पंख्याने वारा घेण्याची वेळ आली. यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला. शिवसेनेने प्रशासनाला धारेवर धरत निषेधार्थ घोषणाबाजी केली. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली. वायरमधील तांत्रिक दोषाचे कारण विद्युत विभागाने दिले असले तरी जनरेटरमधील डिझेल संपल्याची साशंकता काहींनी व्यक्त केली.

महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मासिक सर्वसाधारण सभा खंडित वीजपुरवठय़ाने चांगलीच गाजली. प्रारंभी श्रद्धांजली आणि अभिनंदनाच्या प्रस्तावांचे वाचन झाले. सभागृहातील दिवे, पंखे बंद असले तरी ध्वनिक्षेपक यंत्रणा मात्र कार्यान्वित होती. याविषयी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी विचारणा केली. आठ दिवसांपूर्वी सभेची तारीख जाहीर झाली होती. सभागृहातील विद्युत व्यवस्था सुरळीत राखण्याची प्रशासनाची जबाबदारी असूनही असे कसे घडले, असा प्रश्न त्यांनी केला. स्मार्ट सिटीचा गवगवा होत असताना सभागृहातील वीजपुरवठा सुरळीत राखता येत नसल्याची बाब दुर्दैवी आहे. प्रशासन निव्वळ चालढकल, उडवाउडवीची उत्तरे देऊन मोकळे होते. सर्व काही धकून जाते, ही प्रशासनाची मानसिकता असून प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तांना जबाबदारी टाळता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत सभेच्या कामकाजाला सुरुवात करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. या घटनाक्रमावेळी विद्युत विभागाचे प्रमुख देवेंद्र वनमाळी सभागृहात नव्हते. महापौरांनी विचारणा करूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर दिले गेले नाही. अखेर १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करावी लागली. पण, त्यातून काहीच साध्य न झाल्याने विरोधक प्रशासनावर तुटून पडले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी प्रशासनावर आगपाखड केली. स्मार्ट सिटी कंपनीच्या गुरुवारच्या बैठकीत कोटय़वधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली गेली. या विषयावर सदस्यांनी बोलू नये, म्हणून तांत्रिक बिघाड दाखवून वीजपुरवठा खंडित केला गेल्याची साशंकता व्यक्त झाली. सभागृहासाठी जनरेटरची व्यवस्था आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर स्वयंचलित पद्धतीने सुरू होते. सभेपूर्वी तपासणी न केल्यामुळे सदस्यांचा वेळ वाया गेल्याचे आरोप झाले. वीजपुरवठा सुरळीत होण्यास किती कालावधी लागेल, याची माहिती देण्यास महापौरांनी सांगितले. तेव्हा प्रशासनाकडून उत्तरही दिले गेले नाही. यामुळे सदस्यांच्या संतापात भर पडली. त्यांनी हा महापौरांचा अवमान असल्याचे सांगून गोंधळ घातला.

अखेर वनमाळी सभागृहात अवतीर्ण झाले. त्यांनी सभागृहातील वायरमध्ये तांत्रिक दोष उद्भवल्याचे कारण देऊन दिलगिरी व्यक्त केली. अध्र्या तासात वीजपुरवठा सुरळीत होईल, असे नमूद केले. स्थायी सभापती उद्धव निमसे यांनी सेना नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचाही उपयोग झाला नाही. यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा तासाभरासाठी तहकूब करण्याची घोषणा महापौरांना करावी लागली. या घडामोडीनंतर शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. तासाभरात वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर सभागृहाचे काम सुरू झाले.