अंमावास्येच्या दिवशीही आता कांद्याचे लिलाव; दर शनिवारी दोन्ही सत्रात व्यवहार

नाशिक : अशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अमावास्येच्या दिवशी लिलाव बंद ठेवण्याची परंपरा व्यापारी संघटनेच्या पुढाकारातून बंद करण्यात आली आहे. आता अमावास्येच्या दिवशी सकाळच्या सत्रात लिलाव करण्यात येणार आहे. या शिवाय आजवर शनिवारी केवळ सकाळच्या सत्रात लिलाव व्हायचे. आता प्रत्येक शनिवारी दोन्ही सत्रात लिलाव करण्यात येणार आहे.

१९४७ मध्ये स्थापन झालेल्या लासलगाव बाजार समितीत प्रदीर्घ काळापासून अमावास्येला कामकाज बंद ठेवण्याचा पायंडा पडला. अंधश्रध्देपायी तो जपण्याचे प्रयत्न झाले. मध्यंतरी एकदा अमावास्येच्या दिवशी बाजार समितीचे कामकाज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, काही घटनांमुळे तो निर्णय पुन्हा मागे घ्यावा लागल्याचे काही जुनेजाणते व्यक्ती सांगतात.

मुळात लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे. एक दिवस जरी कामकाज बंद राहिले तरी शेतकऱ्यांची अडचण होते. करोनाच्या र्निबधात १२ दिवस बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे कांद्यासह कृषिमालाची विक्री करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. लासलगाव बाजार समितीत एका दिवशी पाच ते सात कोटींची उलाढाल होते. अमावास्थेला कामकाज बंद राहत असल्याने उलाढाल तर ठप्प होते. शिवाय शेतकऱ्यांना माल विक्रीत अडचणीला तोंड द्यावे लागत होते. अमावास्येचे हे ग्रहण सुटावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. प्रदीर्घ काळापासून चालत आलेली अमावास्येच्या दिवशी बाजार बंद ठेवण्याची परंपरा खंडित करण्याचा निर्णय लासलगाव कांदा व्यापारी संघटनेकडून घेण्यात आला. वर्षभरात १२ अमावास्या असतात. शनिवार, रविवारचा अपवाद वगळता वर्षभरात अमावास्येमुळे आठ ते दहा दिवस बाजार समितीचे कामकाज बंद राहत असे. दिवसाला पाच ते सात कोटींची उलाढाल लक्षात घेतल्यास दरवर्षी अमावस्येमुळे ६० ते ७० कोटींची उलाढाल थंडावत असे. शेतकऱ्यांना माल विक्रीस मर्यादा येत होती. ही अडचण आता दूर झाली आहे. अमावास्येला बाजार सुरू करायचे की नाही, हा आठ दिवसापासून प्रलंबित असलेला विषय मंगळवारच्या बैठकीत मार्गी लागला. आता अमावास्येच्या दिवशी पहिल्या सत्रात म्हणजे अर्धा दिवस लिलाव होईल. तर शनिवारी अर्धा दिवस होणारे कामकाज दोन्ही सत्रात म्हणजे पूर्णवेळ होणार आहे.सोमवारी बाजार समितीत विक्रमी आवक झाली. व्यापाऱ्यांनी आलेल्या सर्व कांद्याचे लिलाव होतील याचे नियोजन केले. त्याबद्दल संघटनेकडून काही व्यापाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

आवक वाढूनही दर टिकून

निर्बंध शिथील झाल्यानंतर लासलगावसह सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे. सोमवारी लासलगाव बाजारात तब्बल ३८ हजार २९६ क्विंटलची आवक झाली. मंगळवारी सकाळच्या सत्रात सुमारे २४ हजार क्विंटलची आवक झाली. सायंकाळपर्यंत तो आकडा आदल्या दिवशी प्रमाणे राहण्याची चिन्हे होती. या दिवशी किमान ७५१, कमाल २२६० तर सरासरी १८२५ रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. आवक वाढली असली तरी दरावर त्याचा परिणाम झालेला नाही.

पारंपरिक जुन्या पध्दतीनुसार अमावास्येला बाजार समितीचे कामकाज बंद ठेवायची पध्दत होती. करोनामुळे शेतकऱ्यांकडे कांदा मोठय़ा प्रमाणात पडून आहे. या स्थितीत जलदपणे लिलावाचे काम होणे आवश्यक आहे. या बाबी लक्षात घेऊन आता अमावास्येच्या दिवशी बाजार समिती एका सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शनिवारी आधी केवळ सकाळच्या सत्रात लिलाव व्हायचे. आता दोन सत्रात म्हणजे पूर्ण दिवस लिलाव होतील.

– नंदकुमार डागा (अध्यक्ष, लासलगाव कांदा व्यापारी संघटना)