शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे देण्यात येणारा ‘कार्यक्षम आमदार पुरस्कार २०१६’ बच्चू कडू यांना मंगळवारी माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी आमदार व पत्रकार माधवराव मिलये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची कन्या डॉ. शोभा नेर्लिकर व जामात डॉ. विनायक नेर्लिकर यांनी सार्वजनिक वाचनालयाला दिलेल्या देणगीच्या व्याजातून दर वर्षी कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. २००३ पासून सुरू झालेल्या या पुरस्काराने आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावित, दत्ताजी नलावडे, गिरीश बापट, सा. रे. पाटील, भाऊसाहेब फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०१६ चा कार्यक्षम आमदार पुरस्कार अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूर-परतवाडा मतदारसंघाचे प्रतिनिधी ओमप्रकाश तथा बच्चू कडू यांना येथील परशुराम सायखेडकर नाटय़गृहात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या सोहळ्यात देण्यात येईल. कडू हे प्रहार या युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. विषय तडीस नेण्यासाठी करण्यात येणाऱ्या अनोख्या आंदोलनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. विधानसभेतही प्रभावी भाषण करण्यात ते आघाडीवर असतात. विदर्भातील जनतेचे विविध प्रश्न ते प्रामुख्याने पुढे मांडत असतात. राहुल गांधी विदर्भात येऊन गरीब शेतकऱ्याच्या पत्नीला घर बांधून देतात म्हणून कडू यांनी थेट अमेठीत जाऊन तिथल्या गरजू बाईला घर बांधून दिले. रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका घेतली आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये विदर्भातील रुग्णांवर त्वरित उपचार होतील यासाठी ते प्रयत्नरत असतात. अपंगांच्या प्रश्नांवर लढणारा नेता म्हणूनही ते ओळखले जातात.
हेमंत टकले, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, डॉ. शोभा नेर्लिकर, डॉ. विनायक नेर्लिकर, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या निवड समितीने पुरस्कारासाठी बच्चू कडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कार्यक्रमास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष प्रा. विनया केळकर, कार्यवाह मिलिंद जहागीरदार यांनी केले आहे.