नाशिक : शेतीच्या किरकोळ वादातून लहान भावाने मोठय़ा भावाचा गोळ्या झाडून खून के ला. या प्रकरणी दोन संशयितांना सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील देवीदास कुटे (३५) हे गिते मळा परिसरात राहत होते. देवीदास यांचा लहान भाऊ कृष्णा (२५) याच्याशी शेतीच्या जमिनीवरून त्यांचा वाद होता.

त्या वादातून कृष्णाने देवीदास यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. काही वर्षांपूर्वी देवीदास यांना न विचारता कृष्णाने शेतजमीन विकल्याने वाद चिघळला होता. मंगळवारी रात्री कृष्णा आणि त्याचा मित्र प्रवीण वाघचौरे (२७) हे देवीदासच्या घरासमोर आले. त्या वेळी देवीदास कु टुंबासह झोपले होते. कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावल्याने देवीदास यांनी घराचा दरवाजा उघडत समोरील व्यक्तीला विचारणा केली. त्या वेळी सोमनाथ गिते कुठे राहतात, त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक हवा. त्यांच्या पोल्ट्रीसाठी पिल्ले आणली असून ती त्यांना द्यायची असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले.

गिते यांचा नंबर देण्यासाठी देवीदास यांनी पत्नीला भ्रमणध्वनी आणायला सांगितला. आणि ते घराबाहेर पडले. नेमकी हीच संधी साधत संशयित आणि घराच्या बाजूला अंधारात बसलेला कृष्णा याने देवीदासच्या डोक्यात चार गोळ्या झाडल्या.  देवीदास यांच्या पत्नीने त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, देवीदास यांचा प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी शेजारील गिते यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. गिते आल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. देवीदास रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.