08 December 2019

News Flash

नियोजित ‘मेट्रो’ची रिक्षाचालकांना धास्ती

शहरात सद्य:स्थितीत सुमारे १५ हजार रिक्षा असून दररोज हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात.

व्यवसायावर परिणाम होण्याची चिंता

नाशिक : शहरात मनपाकडून बससेवा ताब्यात घेण्याच्या घोषणेनंतर आता सार्वजनिक जलद वाहतुकीसाठी ‘मेट्रो निओ’ची तयारी सुरू झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या व्यवसायावर होईल की काय, अशी धास्ती रिक्षाचालकांना वाटू लागली आहे. बससेवा आणि मेट्रो प्रत्यक्षास येण्यास बराच अवधी आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नसला तरी पालिकेने तितक्याच तत्परतेने रिक्षा थांब्यांसह तत्सम प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे श्रमिक सेना रिक्षाचालक-मालक संघटना आणि शिव वाहतूक सेनेचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शहरात सद्य:स्थितीत सुमारे १५ हजार रिक्षा असून दररोज हजारो प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. पालिकेने बससेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राज्य परिवहनने बसफेऱ्या घटवून प्रवाशांना वेठीस धरले आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पालिकेच्या बससेवेला अद्याप मुहूर्त लागला नसल्याने शहरवासीयांची भिस्त रिक्षावरच आहे. या एकंदर स्थितीचा अंदाज घेत रिक्षाचालक प्रवाशांना वेठीस धरतात. मीटरऐवजी अवाच्या सवा भाडे आकारणी, जवळचे भाडे नाकारणे, क्षमतेहून अधिक प्रवासी कोंबणे, अरेरावीपणा यांना काही अंशी प्रवासी वर्ग वैतागला आहे. या स्थितीत बससेवेनंतर शहरात मेट्रोची घोषणा झाली आणि समस्त रिक्षाचालक-मालकांची धुरा वाहणाऱ्या संघटनांमध्ये चिंतेचे सावट पसरले.

शिव वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी भोर म्हणाले, आधुनिक सेवांचा रिक्षा व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही. उलट प्रवासी वाहतुकीत स्पर्धा निर्माण झाल्यास रिक्षाचालक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करतील. कित्येक वर्षांपासून रिक्षांसाठी शहरात ५५० थांब्यांची मागणी केली गेली आहे. काही वर्षांपूर्वी त्यातील केवळ ७० ते ८० थांब्यांसाठी जागा दिली गेली. पालिकेने थांब्यासाठी जागेची तातडीने पूर्तता करावी.

मेट्रो वा तत्सम सुविधांमुळे रिक्षा व्यवसायावर १०० टक्के परिणाम होईल. शहराच्या विकासात रिक्षाचालकांचे काही अंशी योगदान आहे. नव्या सुविधांमुळे मूळ व्यवस्था उपाशी आणि नवीन तुपाशी असे व्हायला नको. शहराच्या प्रगतीसाठी वाहतुकीच्या सुविधा आवश्यक आहेत. त्या उभारताना रिक्षाचालकांचा रोजगार हिरावला जाणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. अनेकदा पाठपुरावा करूनही रिक्षांसाठी थांबे मिळालेले नाहीत. शासनाने रिक्षाचालकांना निवृत्तिवेतन वा तत्सम योजना लागू करण्याची गरज आहे.

– सुनील बागूल  (संस्थापक, श्रमिक सेना रिक्षा-चालक मालक सेना)

First Published on July 24, 2019 4:29 am

Web Title: fear in rickshaw driver over metro train plan in nashik city zws 70
Just Now!
X