शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील एस. कुमार दुकानात भ्रमणध्वनी दुरुस्तीवरून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वादावादी होऊन जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी दुकानदारासह ग्राहकाने परस्परविरोधी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरुड शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हरीश निरंजनदास पोपली यांच्या मालकीचे एस. कुमार मोबाइल शॉप असून या ठिकाणी कुंडाणे येथील अभय दिलीप अमृतसागर या तरुणाने भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी दिला होता. मोबाइल दुरुस्तीवरून शुक्रवारी दुपारी या दोघांमध्ये वादावादी होऊन जोरदार भांडण झाले. त्यातून दुकानदार हरीश आणि ग्राहक अभय यांनी आपापल्या मित्रांना फोन करून गोळा करीत हाणामारी केली. या प्रकरणी शहर पोलिसात परस्परविरुद्ध तक्रारी देण्यात आल्या आहेत. हरीश पोपली (२७) याने सागर त्रिभुवन, अभय दिलीप अमृत सागर आणि त्याच्या साथीदारांनी भ्रमणध्वनी दुरुस्त केला नाही या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे म्हटले आहे. यावरून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी तक्रार अभय दिलीप अमृतसागर (२६) याने दिली. त्यानुसार, अभय अमृतसागर हा आपल्या भावासोबत एस कुमार दुकानात भ्रमणध्वनी दुरुस्तीसाठी गेला असता दुकान मालकाने वाद घालून मारहाण केली. आपल्या मित्रांना बोलावत मारहाण करत डोक्यावर दगड मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दुकान मालासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अ‍ॅट्रॉसिटीकायदा रद्द करू दिला जाणार नाही – आ. हरिभाऊ राठोड

नाशिक : नांदुर नाका परिसरात पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ. हरिभाऊ राठोड यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजातर्फे ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढले जात आहेत. परंतु, अनुसूचित जाती-जमातीतील घटकांना संरक्षण देणारा हा कायदा कदापी रद्द करू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आडगांव शिवारात नांदुर नाका येथे पाच वर्षीय बालिकेवर सार्वजनिक स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी बंटी ऊर्फ सचिन पाटील (३५) याला अटक करण्यात आली आहे. संशयिताने बालिकेला मारण्याची धमकी दिली. अत्याचाराची घटना निषेधार्ह असल्याचे राठोड यांनी नमूद केले. अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी शासनाने दखल घेणे गरजेचे आहे. विशेष पथकामार्फत या प्रकरणाचा तपास करून पीडित बालिका व कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढला जात आहे. परंतु, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करू दिला जाणार नसल्याचे राठोड यांनी सांगितले.