निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ३० वर्षीय युवकास करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित युवक रजानगर भागातील बेकरीत काम करतो. परदेशवारीचा त्याचा इतिहास नाही. संपर्कातून त्याला विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. १२ मार्च रोजी त्याला खोकला, ताप अशी लक्षणे होती. खासगी डॉक्टरकडे तो गेला होता. १८ तारखेला निफाडला गेला. या काळात बरे न वाटल्याने ग्रामीण रूग्णालयात गेल्यानंतर त्याला नाशिकला पाठविण्यात आले. स्वतःच्या दुचाकीवरून तो जिल्हा रूग्णालयात दाखल झाला. त्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर आरोग्य विभागाच्या २० पथकांनी लासलगाव, निफाडला धाव घेतली. त्याच्या कुटुंबातील आठ सदस्यांना शहरातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाणार आहे. मागील १५ दिवसांत त्याच्या संपर्कात कोण आले, त्यांची छाननी सुरू करण्यात आली. नाशिकमध्ये आतापर्यत एकूण ७३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील ७२ नमुने नकारात्मक तर एक नमुना सकारात्मक आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.