News Flash

पालिकेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना अखेर अटक

भाजप महिला मेळावा उधळण्याच्या प्रकरणात शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना अटक केली.

शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना घेऊन जाताना पोलीस.

भाजप महिला मेळावा उधळण्याचे प्रकरण
शिवसेना-भाजपमधील मतभेद तीव्रतेने चव्हाटय़ावर आल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी भाजप महिला मेळावा उधळण्याच्या प्रकरणात शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना अटक केली. या प्रकरणात दरोडय़ाचे कलम लावल्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी आधीच मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले होते. या प्रकरणात महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांना अटक होऊन त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तपासात बडगुजर यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या प्रतीकात्मक पुतळा दहन आंदोलनाच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी पक्षाने बडगुजर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यातच आंदोलक शिवसैनिकांनी ते आंदोलन बडगुजर यांनी घडवून आणल्याचे म्हटले आहे. यामुळे शिवसेना बडगुजर यांच्या मागे उभी राहणार की त्यांना वाऱ्यावर सोडणार याबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडा व विदर्भासंदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आणि शिवसैनिकांनी भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात धुडगूस घालत तो उधळण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणात स्थानिक भाजप आमदारांच्या मागणीमुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत सेनेच्या गाडेकर यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. या घडामोडीमुळे सेना व भाजप यांच्यातील वितुष्ट कमालीचे वाढले. सेनेच्या मंत्र्यांनी शिवसैनिकांची कारागृहात भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांवर शरसंधान साधले. सूड भावनेतूून खोटे गुन्हे दाखल केले गेले असून दरोडय़ाचे कलम मागे घेण्याची मागणी सेनेच्या मंत्र्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली होती.
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सेनेवर आगपाखड झाली असली तरी वरिष्ठांनी या मुद्यावर जाहीरपणे बोलण्याचे टाळले होते. प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपुष्टात आल्यानंतर मंगळवारी पोलिसांनी बडगुजर यांना अटक करणे हा योगायोग नसल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.
बडगुजर यांच्या अटकेवर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असणार याविषयी परस्परविरोधी मतांतरे व्यक्त होत आहे. सिडकोतील एका नगरसेवकाला सेनेत पुन्हा प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी प्रतीकात्मक पुतळा दहन आंदोलन केले होते. या आंदोलकांना सोडविण्यासाठी बडगुजर पोलीस ठाण्यात गेल्यावरून शिवसेनेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यास बडगुजर यांनी त्या आंदोलनाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे उत्तर दिले आहे. या स्थितीत शिवसेना काय भूमिका घेईल, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमागे पोलिसी ससेमिरा लावल्याचे आरोप झाले होते. नाशिक येथेही त्याची प्रचीती येत असल्याची तक्रार सेनेचे मंत्री करत आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे सामोरे जाणार आहेत. त्यामुळे उभयतांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजप प्रदेश बैठकीत सर्व नेत्यांनी मित्र पक्ष शिवसेनेवर टीकास्र सोडले. लगोलग ही कारवाई झाल्यामुळे मित्र पक्षातील वितुष्टात आणखी भर पडणार आहे.

बडगुजर एकाकी
सिडको येथे प्रतीकात्मक पुतळा दहनाचे जे आंदोलन झाले होते, त्यामागे सुधाकर बडगुजर हे कारणीभूत असल्याची बाब हकालपट्टी झालेल्या शिवसैनिकांनी वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणली आहे. त्या आंदोलनासाठी बडगुजर यांनी संपर्क नेत्यांचा प्रतीकात्मक पुतळा उपलब्ध करून दिला, आंदोलन झाल्यावर पोलीस ठाण्यात ते सोडवण्यास आले होते असेही त्यांनी माजी मंत्री बबन घोलप यांच्या निदर्शनास आणून दिले. या एकंदर घडामोडींमुळे शिवसेना बडगुजर यांच्या मागे उभी राहील याची शक्यता कमी झाली आहे. या संदर्भात सेनेच्या स्थानिक नेत्यांनी फारसे बोलणे टाळले. उलट पक्षांतर्गत कारवाईत अडकण्याच्या धास्तीने बडगुजर यांनी अन्य प्रकरणात स्वत:ला अटक करवून घेतल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 1:17 am

Web Title: former corporation house leader sudhakar badgujar finally arrested
Next Stories
1 कोळी महादेव समाजाचा मोर्चा
2 उत्तर महाराष्ट्रात वीज पडून एक ठार
3 अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयावर ईडी आणि एसीबीचा छापा
Just Now!
X