५० लाख रुपयांना गंडा

वाहतूक व्यवसायात पैसे गुंतविण्यास सांगून मासिक टक्केवारी आणि वाहतुकीसाठी दोन बस देण्याचे आमिष दाखवत एका वृद्धाला ५० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. ही घटना इंदिरानगर येथे घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश गवाल (७०, रा. खोले मळा) हे बालाजी टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल नावाने व्यवसाय करतात. गवाल यांची मेघा कलकोट यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. त्यांनी कर्नाटक येथील नवीन आचार्य याच्याशी ओळख करून दिली. व्यवसायासाठी दोन बस आणि मासिक टक्केवारी देण्याचे आमिष गवाल यांना दाखविण्यात आले.

त्यानुसार गवाल, कलकोट, त्यांची मैत्रीण श्रद्धा इंगोले, कल्पना पाटील, समजीन कलकोट आणि आचार्य यांची एकत्रिक बैठक बोरिवली येथील हॉटेल प्लाझामध्ये झाली. या बैठकीत आचार्यने ५० लाख रुपये द्या, तुम्हाला दोन बस आणि त्यासोबत करार पाठवून देतो, असे सांगितले. या दोन्ही बस बंगळूरु-मुंबई या मार्गावर चालवू. यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला दररोज पाठविण्यात येतील, असे आमिष गवाल यांना दाखविण्यात आले.

त्यानंतर गवाल यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश तारण म्हणून मागितला. आचार्यने तात्काळ तो धनादेश दिला. त्यामुळे गवाल यांचा या सर्व संशयितांवर विश्वास बसला. त्यांना आगाऊ रक्कम म्हणून २५ लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यास सांगितले. गवाल यांनी नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेचा धनादेश २६ एप्रिल २०१९ रोजी मनीमंत्री कंपनीच्या नावाने मेघा कलकोट, समीर कलकोट यांच्या ताब्यात दिला.

यानंतर मधल्या काळात संशयितांनी वेगवेगळ्या कारणांनी गवाल यांच्याकडून पुन्हा २५ लाख रुपये घेतले. गवाल यांनी ५० लाख रुपये दिल्यानंतर संशयितांनी दैनिक उत्पन्न म्हणून गवाल यांना एक लाख ७५ हजार रुपये असे पाच दिवस आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे सात लाख रुपये दिले. त्यामुळे गवाल यांचा या सर्वावर विश्वास बसला. परंतु, कालांतराने आचार्य, मेघा कलकोट, समीर आणि अन्य पाच जणांनी पैसे देणे बंद केले. बैठकीत ठरल्याप्रमाणे दोन बस तसेच करार आला नाही. याबाबत कर्नाटक पोलिसांच्या मदतीने संशयित आचार्य याच्याशी संपर्क साधला असता पुढील दोन महिन्यांत २५ लाख रुपये देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात पोलिसांसमक्ष लिहून दिले. मात्र मुदत संपूनही संशयित आचार्य किंवा अन्य कोणी पैसे दिले नाहीत.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गवाल यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नवीन आचार्य, मेघा कलकोट, समीर कलकोट, कल्पना पाटील आणि श्रद्धा इंगोले यांच्या विरोधात तक्रार केल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.