16 October 2019

News Flash

अपंगांना विविध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण

जिल्हा परिषदेकडून १० लाखांचा निधी मंजूर

जिल्हा परिषदेकडून १० लाखांचा निधी मंजूर

शैक्षणिक पात्रता असूनही केवळ व्यंग असल्यामुळे अपंगांना नोकरीपासून वंचित राहावे लागते. रोजगार मिळणेही अवघड असते. या पाश्र्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील अपंग आता रोजगार मिळवून स्वावलंबी होणार आहेत. खेडचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांच्या प्रयत्नांमुळे अपंगाच्या विविध उद्योगांकरिता मोफत प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याने १० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

अपंगाच्या कायमस्वरूपी शाश्वत स्वयंरोजगारासाठी अत्यंत महत्त्वाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच टक्के सामूहिक सेस योजनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात इगतपुरी तालुक्यातील बारशिंगवे येथे अपंगांसाठी २५ लाखांचे लघुउद्योग केंद्र मंजूर आहे. इगतपुरी तालुक्यातील अपंगांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी या दोन्ही योजना परिणामकारक ठरणार आहेत.

यापूर्वी मंजूर असलेल्या लघुउद्योग केंद्रामुळे अपंगांचे प्रश्न मार्गी लागतील. अपंगांना विविध उद्योगांचे विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. यासाठी लोहकरे यांनी तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला होता. गेल्यावर्षी लघुउद्योग केंद्रासाठी त्यांनी २५ लाखांचा निधी मंजूर करून आणला. या केंद्रातून विविध मार्गदर्शन, विविध कौशल्य आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळणार आहे. आदिवासी डोंगरी भागातील सेंद्रिय नागलीवर प्रक्रिया करून पापड, बिस्किट, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अनुदानातून गणवेश शिवून देणे, कापडी पिशवी शिवून प्लास्टिक पिशवीला पर्याय, बेकरी उद्योगातून किरकोळ आणि होलसेल दराने पुरवठा करणे, गावठी आंबे, करवंद, आवळ्याचे लोणचे बनवणे, मुरमुरे, शेंगदाणे चिक्की अशा स्थानिक पातळीवरील कच्च्या मालावर आधारित उद्योग येथे सुरू करण्यात येतील.

यासाठी शिवणकाम, अन्न प्रक्रिया, लोणचे, पापड, बेकरी आदी उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येईल. मोफत मिळणाऱ्या प्रशिक्षणात एक वेळ चहा, जेवण, येण्या-जाण्याचे गाडी भाडे देण्यात येईल. काही यशस्वी लघुउद्योग केद्रांच्या उद्योगांच्या ठिकाणी भेटीही देण्यात येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात उत्पादन कसे घेतात, हेही दाखवले जाणार आहे. अपंगांकडून तयार होणाऱ्या मालास डीआरडीएकडून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. अपंगांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन लोहकरे यांनी केले आहे.

अपंगांना सर्व तऱ्हेचे प्रशिक्षण

इगतपुरी तालुक्यातील अपंग कोणतेही कौशल्याचे काम करण्यास तत्पर आहेत. शारीरिक व्यंगामुळे अपंगांना धावपळ शक्य होत नाही. यासाठी लघुउद्योग केंद्र गेल्या वर्षी मंजूर केले. मात्र तिथे उद्योग सुरू करण्यापूर्वी कौशल्य विकास प्रशिक्षणही महत्त्वाचे असल्याने यासाठी प्रयत्न केले. संभाव्य उद्योगातील ज्ञान, अनुभव, प्रत्यक्ष सराव प्रशिक्षणात दिले जाईल.    – हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य खेड

First Published on January 8, 2019 12:50 am

Web Title: free training for the disabled people