25 January 2020

News Flash

मंदिरांच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध होण्याची चिन्हे

पंतप्रधानांच्या खासदार पालकत्व योजनेंतर्गत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव विकासासाठी स्वीकारले आहे.

अंजनेरीतील मंदिरांचे रुप पालटणार
अंजनेरी येथील मंदिरांच्या संवर्धनासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी खा. हेमंत गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांच्याकडे केली आहे. या मंदिरांच्या संवर्धन व दुरुस्तीसाठी ठरावीक कालावधीकरिता विशेष प्रकल्प राबविण्याची गरजही त्यांनी सांस्कृतिकमंत्र्यांपुढे मांडली आहे. मंदिरांच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याने अंजनेरीच्या मंदिरांचे रूप पालटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या खासदार पालकत्व योजनेंतर्गत गोडसे यांनी अंजनेरी हे गाव विकासासाठी स्वीकारले आहे. त्यामुळे या गावाचा कालबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी खासदारांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अंजनेरी हे तीर्थक्षेत्र असल्याने गावात मंदिरांची संख्या अधिक आहे. गावालगत १६ मंदिरे जैन, वैष्णव व शैव पंथीयांची आहेत. ही मंदिरे कित्येक वर्षांपूर्वीची आहेत. या मंदिरांच्या दुरुस्तीकडे सतत दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मंदिरांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या मंदिरांच्या दुरुस्तीची गरज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती.
या मंदिरांचे जतन करण्याचे काम केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येते; परंतु त्यांच्याकडूनही मंदिरांच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले गेले नाही. गोडसे यांनी तीन महिन्यांपूर्वी सर्व १६ मंदिरांचे नूतनीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा व पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना पत्र लिहिले होते. या पत्रानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पथक पाठवून मंदिरांचे सर्वेक्षण केले होते.
नाशिक जिल्हा हा औरंगाबाद पुरातत्त्व विभागात समाविष्ट होतो. औरंगाबाद विभागाच्या संचालकांनी गोडसे यांचा प्रस्ताव केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे १ डिसेंबर रोजी पाठविला. त्यामध्ये त्यांनी १६ मंदिरांच्या नूतनीकरणासाठी गट केले. त्यासाठी दोन कोटी सोळा लाख अठ्ठय़ाण्णव हजार रुपयांचा निधी लागणार असून त्यांनी हा निधी मिळावा अशी केंद्राकडे मागणी केली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाची वार्षिक तरतूद अत्यंत कमी आहे. मंदिर संवर्धनाविषयीचा प्रस्ताव त्वरित मंजूर होणे आवश्यक असल्याने गोडसे यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्र्यांसह केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या संचालकांची भेट घेत त्यांच्यापुढे मागण्या मांडल्या. काही कालावधीसाठी विशेष प्रकल्पाची आखणी करावी, त्यासाठी दरवर्षी तरतूद करावी. जेणेकरून नियोजित वेळेत सर्व १६ मंदिरांचे नूतनीकरण होईल, असे त्यांनी सुचविले.

First Published on December 17, 2015 12:36 am

Web Title: funding for temple
Next Stories
1 कपातीच्या निर्णयावर पुन्हा एकदा ‘पाणी’
2 गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी द्यावा
3 अगतिक बसचालकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
Just Now!
X