जिल्ह्य़ात सर्वत्र ‘डीजे’मुक्त मिरवणुका

गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे रविवारी विसर्जन मिरवणुकांमध्ये यंदा प्रथमच सर्वत्र डीजेच्या दणदणाटाऐवजी पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमला. न्यायालयाने डीजेवरील बंदी कायम ठेवल्याने ध्वनिप्रदूषण रोखण्याचे आव्हान शहर आणि ग्रामीण पोलीस दलाने गणेश मंडळांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली.

ग्रामीण भागात काही ठिकाणी ध्वनिक्षेपकचा वापर झाला. संबंधितांच्या ध्वनिमापनात नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईची तयारी पोलीस यंत्रणेने ठेवली आहे. दरम्यान, पंचवटीतील तपोवन येथे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी उभारलेल्या स्वागत कक्षाजवळ एका मंडळाने डीजे वाजविल्याची चर्चा झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी पथकाने पाहणी केली असता त्यात तथ्य आढळून आले नाही. सानप यांनीही कथित डीजे वादनाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला. आपण शांतता समितीचे सदस्य असून मागील २५ वर्षांत कधीही गणेशोत्सवात मिरवणूक काढलेली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. डीजेच्या दणदणाटावर न्यायालयाने बंदी घातली आहे. गेल्या वर्षी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी हे प्रतिबंध झुगारत डीजे लावून दणक्यात विसर्जन मिरवणूक काढली होती. यंदा ऐन गणेशोत्सवात न्यायालयाने डीजेवरील बंदी उठविण्यास नकार दिल्याने शहर आणि ग्रामीण पोलिसांनी डीजेचा वापर कुठेही होऊ नये म्हणून केलेले प्रयत्न अनंत चतुर्दशीच्या दिवशी फळास आल्याचे पाहावयास मिळाले. शहराच्या मुख्य मिरवणुकीत २१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती. त्यातील कोणीही डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्य, भोंगे यांचा वापर केल्याचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. नाशिक परिमंडळ एकमध्ये कुठेही डीजेचा वापर झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पंचवटीतील तपोवन येथे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या स्वागत कक्षासमोर मंडळाने डीजे वाजल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तिथे केवळ दोन स्पीकर लावलेले होते. त्या ठिकाणी डीजेचा वापर झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

डीजेला बहुतांश मंडळांनी फाटा दिल्याने सर्वच गणेश मंडळांच्या मिरवणुकीत ढोल-ताशाचा अर्थात पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. पारंपरिक पोशाखात चिमुरडय़ांपासून ते युवांपर्यंत सारे ढोल पथकात सहभागी झाले होते. ढोल-ताशा कमरेला बांधून प्रत्येक पथकाने भगवे ध्वज दिमाखात मिरवण्याची खास व्यवस्था केली. रामनगरी, जिजाऊ महिला, तालरुद्र, शिवसाम्राज्य, शिवसंस्कृती, शिवाज्ञा, माऊली, विघ्नहरण आदी पथकांची वादनाने परस्परांवर कडी करण्याची स्पर्धा सुरू होती. प्रत्येक पथक आपले वेगळेपण अधोरेखित करीत होता. ढोल पथकांचा गजर ऐकण्यासोबत तो भ्रमणध्वनीत चित्रित करण्यासाठी गणेश भक्तांची धांदल उडाली. पारंपरिक वाद्यांच्या वापरामुळे शहर, ग्रामीण भागातील विसर्जन मिरवणुकीत नवीन पायंडा पाडला गेल्याची प्रतिक्रिया भक्तांमध्ये उमटली आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळांना केलेल्या आवाहनाला सर्व गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या वर्षी प्रथमच संपूर्ण शहरात डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली. तपोवन येथील कार्यकर्त्यांमधील वादाचा प्रकार वगळता शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. उपरोक्त घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मिरवणुकीत डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करीत नवीन पायंडा पाडला.   – डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक शहर

तथ्यहीन आरोप

मागील २५ ते ३० वर्षांच्या राजकारणात आपण आजवर गणेश विसर्जन मिरवणूक काढलेली नाही. तपोवन परिसरात स्वागत कक्ष उभारून विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचे स्वागत आपण करतो. शांतता समितीचे सदस्य म्हणून डीजेविरहित मिरवणूक व्हावी, नियमांचे पालन व्हावे, हाच आपला आग्रह आहे. स्वागत कक्षासमोर डीजे वाजल्याचा आरोप राजकीय हेतूने विरोधक करीत आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. स्वागत कक्षात भक्तांच्या स्वागतासाठी साधे दोन स्पीकर लावण्यात आले होते.   – आ. बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष भाजप

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठेही डीजेचा वापर झाला नाही. काही मिरवणुकीत स्पीकरचा वापर झाला.  ध्वनीच्या तीव्रतेच्या नोंदी पोलिसांनी केल्या आहेत. उपरोक्त प्रकरणांत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत  शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. कुठेही अनुचित प्रकार नाही. मालेगावसह अन्य भागातील मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केला.    – संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण